गरीबांच्या तोंडचा ‘भात’ काळ्या बाजारातून दलालांच्या घशात; मिंधे सरकारच्या काळात ब्लॅक मार्केटिंग जोरात

आनंदाचा शिधा या नावाखाली मिंधे सरकार स्वतःची जाहिरातबाजी करीत सुटले आहे. पण प्रत्यक्षात मात्र या रेशनिंगचे ब्लॅक मार्केटिंग सध्या जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. गरीबांच्या तोंडचा भात काळ्या बाजारातून थेट दलालांच्या घशात जात असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. रेशनिंगचा 12 टन तांदूळ एका इंडस्ट्रीजच्या गोदामात उतरवण्याचे काम सुरू असताना हा संपूर्ण साठा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

भिवंडीतील अंजूरफाटा येथील राष्ट्रीय खाद्य निगमच्या गोदामातून रेशनिंगचा 12 टन तांदूळ कल्याणच्या शिधावाटप दुकानांमध्ये नेण्यासाठी जात होता. हा ट्रक रांजणोली नाका येथे आला असताना चालक रमेश जगताप याने जीपीएस यंत्रणा बदलली आणि ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावरून वाशेरे गावात नेला. याबाबतची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी ट्रकचा फिल्मीस्टाईल पाठलाग केला. सदर ट्रक भादाणे येथील जयआनंद फूड इंडस्ट्रीजच्या गोदामात आणला. त्यातील तांदळाच्या 240 गोण्या उतरवत असताना पोलिसांनी भामट्यांवर झडप मारली आणि या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला.

ट्रक चालकाने जीपीएस यंत्रणाच बदलली
राष्ट्रीय खाद्य निगमच्या गोदामातून निघालेला तांदळाचा ट्रक कल्याणच्या रेशन दुकानांमध्ये नेणे अपेक्षित होते. पण चालक जगताप याने पोलिसांना गुंगारा देत जीपीएस यंत्रणाच बदलली. तरीही पोलिसांनी पाठलाग करून ट्रक पकडला.

सील ठोकले
आनंद फूड इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोदामामध्ये रेशनिंगचा तांदूळ कोणाच्या सांगण्यावरून आणण्यात आला, असा सवाल विचारण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी या कंपनीच्या गोदामाला सील ठोकले असून वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जात आहे.