कल्याण ग्रामीणमध्ये एकच निर्धार… मशाल मशाल मशाल; डोंबिवलीच्या सोनारपाडा येथे शिवसैनिकांचा मेळावा

कल्याण ग्रामीण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा बालेकिल्ला आहे. शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवसेनेचा मशाल चिन्हावरील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. सोनारपाडा येथील दुर्वांकुर सभागृहात मेळावा झाला. यावेळी शिवसैनिकांनी ‘कल्याण ग्रामीणमध्ये एकच निर्धार… निवडून येणार मशाल’ असा संकल्प केला.

मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी आमदार सुभाष भोईर म्हणाले, समाजातील सर्व घटकांना शिवसेनेचा मोठा आधार आहे. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत शिवसैनिकांनी मेहनत घेतल्यामुळे मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या पाच वर्षांत जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. कल्याण ग्रामीण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावरील उमेदवाराला मतदार भरभरून मते देऊन विजयी करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याला संपर्क संघटक मृणाल यज्ञेश्वर, जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील, उपजिल्हाप्रमुख अशोक म्हात्रे, संपर्कप्रमुख अरविंद बिरमोळे, शहरप्रमुख अभिजित सावंत, तालुकाप्रमुख मुकेश पाटील, सुरेश पाटील, शहर संघटक मंगला सुळे, ज्योती पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, जाईबाई पाटील, विधानसभा संघटक योगिता नाईक, प्रियांका सावंत, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते.

शिवसैनिकांची अहोरात्र मेहनत
कल्याण ग्रामीणचा आमदार निवडून देण्यासाठी शिवसैनिक अहोरात्र मेहनत घेतील, असा विश्वास कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी व्यक्त केला. तर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद मोठी आहे. सोबतीला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष असल्याने विजय सोपा असल्याचे जिल्हा संघटक वैशाली दरेकर यांनी सांगितले.