भाईंदर पालिका शाळेतील विद्यार्थ्याना ‘आधार’ नाही; योजनांचा लाभही घेता येत नाही

भाईंदर महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास 20 टक्के विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची बाब उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत असून शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून मुलांना वंचित राहावे लागत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू व सेमी इंग्रजी अशा विविध माध्यमांच्या 1 ली ते 10 वीपर्यंत 36 शाळा आहेत.

विकास व चांगले दर्जेदार शिक्षण देणे ही जबाबदारी महापालिकेची आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी दरवर्षी शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी शोध मोहीम राबवली जाते. परराज्यातून कामांसाठी आलेल्या पालकांचे जवळपास 9 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 1 हजार 600 विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. या विद्यार्थ्यांकडे ओळखपत्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची योग्यआकडेवारी शासन नोंदणी पुस्तकात करता येत नाही, महापालिका शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब व गरजू कुटुंबातील आहेत. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शिक्षण विभागाच्या कामकाजावर याचा परिणाम होत आहे.

महापालिका देणार आधार

बहुतांश विद्यार्थी परराज्यातून आलेले आहेत. त्यांच्याकडे जन्म दाखला उपलब्ध नाही. तसेच कुटुंबीयांचा कायमचा पत्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ‘आधारकार्ड’ बनवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे पुरेशी कागदपत्रे नाहीत त्यांचे ओळखपत्र बनवून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी एका खासगी संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती उपायुक्त प्रसाद शिंगटे यांनी दिली आहे.