पुण्यात मेट्रो स्टेशनला आग, मोदींनी गेल्या महिन्यात केले होते उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 सप्टेंबरला उद्घाटन झालेल्या पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. राम मंदिर, अटल सेतू, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, गुजरातचे राजकोट विमानतळ, दिल्ली विमानतळ टर्मिनल – 1, जबलपूर विमानतळ, बुंदेलखंड एक्सप्रेस-वे, नवीन संसद भवन, भारत मंडपम, जी-20 अशा मोदींनी उद्घाटन केलेल्या अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले, अनेक प्रकल्प कोसळले.

पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनला आग लागल्याचे वृत्त कळताच अग्निशमन दलाकडून तातडीने धाव घेत विशेष उपकरणांचा वापर करत आग विझवली आणि दुर्घटना टळली. येथे वेल्डिंगचे काम सुरू असल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याआधी सिंधुदुर्ग जिह्यातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, अटल सेतूला तडे गेले, दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ आणि जबलपूर विमानतळाचे छत कोसळल्यानंतर गुजरातमधील राजकोट विमानतळाचे छत कोसळले.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ – सुप्रिया सुळे

निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत उद्घाटने उरकण्याचा खटाटोप प्रवाशांच्या जिवावर बेतू शकतो, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि मिंधे सरकारवर टीका केली आहे. या घटनेत मेट्रो स्थानकाचे मोठे नुकसान झाले असून यासाठी केलेला खर्चही वाया गेला. या जळीत प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

जानेवारी 2024 रोजी उद्घाटन झालेल्या राम मंदिराचे छत पाचच महिन्यांत गळायला लागले. मंदिरासाठी 1,400 कोटी खर्च आला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी खुल्या करण्यात आलेल्या अटल सेतूला 21 जून रोजी तडे गेल्याचे आढळले. यासाठी 17 हजार 840 कोटींचा खर्च आला आहे. 7 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे 4 डिसेंबर 2023 रोजी अनावरण झाले होते. 26 ऑगस्ट 2024 रोजी तो कोसळला. 27 जुलै 2023 रोजी उद्घाटन झालेल्या गुजरातच्या राजकोट विमानतळाचे छत वर्षभरातच कोसळले.