लाईव्ह शो, कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत गोलमाल, हायकोर्टात जनहित याचिका दाखल; दिवाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी

नवी मुंबईत जानेवारी 2025 मध्ये ब्रिटिश बँड कोल्डप्लेच्या बहुप्रतीक्षित कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर लाईव्ह शो, कॉन्सर्टच्या ऑनलाइन तिकीट विक्रीतील काळाबाजाराकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी निश्चित केली.

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीत अनियमितता झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यावरून वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ऍड. अमित व्यास यांनी सोमवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिका सादर केली. लाईव्ह शो, कॉन्सर्टसारख्या मोठय़ा इव्हेंटच्या ऑनलाइन तिकीट विक्रीत मोठय़ा प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार होत आहे. हा काळाबाजार रोखण्यासाठी न्यायालयाने निर्देश द्यावेत, असे म्हणणे मांडत ऍड. व्यास यांनी तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली. त्यानुसार खंडपीठाने दिवाळी सुट्टीनंतर सुनावणी ठेवली. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकिटे ‘बुक माय शो’ या ऑनलाइन बुकिंग वेबसाइटवर उपलब्ध होती. ‘बुक माय शो’ने कॉन्सर्टच्या ऑनलाइन तिकीट विक्रीत फेरफार केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

याचिकेत काय म्हटलेय?

z ‘बुक माय शो’ने तिकीट विक्रीत केलेल्या गैरव्यवहाराचा पोलीस तपास सुरू आहे, मात्र अजूनही इतर वेबसाईटमार्फत कोल्डप्ले कॉन्सर्टची चढय़ा भावाने तिकीट विक्री सुरू आहे.

z लाईव्ह शो, कॉन्सर्टसारख्या मोठय़ा कार्यक्रमांच्या ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची आवश्यकता आहे.

z आयपीएल सामने तसेच 2023 मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांवेळीही अशाप्रकारे सर्रासपणे अवैध मार्गाने तिकीट विक्री सुरू होती.