गोळीबारप्रकरणी दीपक बडगुजर, शेवाळेसह सात जणांना मोक्का; सत्ताधाऱ्यांच्या दबावातून कारवाई

अडीच वर्षांपूर्वी सिडकोत झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलीस आयुक्तांनी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर, शिवसैनिक अंकुश शेवाळेसह सात जणांवर मोक्का लावला आहे. निवडणूक काळात सत्ताधाऱ्यांच्या दबावातून सूडापोटी ही कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.

सिडकोत फेब्रुवारी 2022 मध्ये रिपाइं शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार झाला होता, त्यात ते जखमी झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यात शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केलेल्या दोन संशयितांच्या सांगण्यावरून शिवसैनिक अंकुश शेवाळे यास या गुह्यात गोवण्यात आले. सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा या गोळीबार प्रकरणाशी संबंध आहे, अशी कबुली देण्यासाठी शेवाळेला अंबड पोलिसांनी कोठडीत अमानुष मारहाण केली. त्यानंतर राजकीय दबावातूनच दीपक बडगुजर यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना नाशिक न्यायालयाने 11 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. यानंतर आता सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या अहवालानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी 19 ऑक्टोबर रोजी या गुह्यातील सात जणांवर संघटीत गुन्हेगारीप्रकरणी मोक्काची कारवाई केली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने, राजकीय सूडापोटी हे षड्यंत्र रचण्यात आले आहे असा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला.