सांगली भाजपमध्ये बंडखोरी उफाळली

आमदार सुधीर गाडगीळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगली जिह्यात भाजपमध्ये बंडखोरीला सुरुवात झाली आहे. भाजप नेते इच्छुक उमेदवार शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे हे सांगली विधानसभा मतदारसंघातून, तर जत मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी मिळाल्यास स्थानिक इच्छुकांनी एकत्र येत एकास एक उमेदवार देऊन बंडखोरी करण्याचे भाजपच्या एका गटाने आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीनंतर सांगली भाजपमध्ये बंडखोरी उफाळली आहे. सुधीर गाडगीळ यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत भाजप इच्छुक उमेदवार शिवाजी डोंगरे यांनी बंडखोरीचा झेंडा फडकविला आहे. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊनही ऐनवेळी आपली उमेदवारी डावलली म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय शिवाजी डोंगरे यांनी माधवनगर येथे पत्रकार परिषदेत घेतला. डोंगरे यांच्या बंडखोरीमुळे आता सांगली भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या अडचणींत वाढ होणार आहे.

जत विधानसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्राला न्याय न देता विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीवरून जतमधील भूमिपुत्र विरुद्ध आयात उमेदवार असा वाद पेटला आहे. पडळकरांना जतमधून उमेदवारी दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा जतच्या भाजप नेत्यांनी दिला आहे. येथील भाजपमधील इच्छुक उमेदवारांनी एकत्रित येत सांगली शहरात पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

यामध्ये भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, भाजप नेते इच्छुक उमेदवार तमनगौडा रवि पाटील, प्रकाश जमदाडे आदी उपस्थित होते.