‘ती’ गोष्ट मी आईबाबांना सांगू शकली नाही! कुस्तीपटू साक्षी मलिकचा आत्मचरित्रात धक्कादायक खुलासा

गतवर्षी महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिकने आपलीही बालपणी ट्युशन देणाऱ्या शिक्षकांकडून छेडछाड केली जात होती, पण मी ही गोष्ट कधीच आपल्या आईबाबांना सांगू शकली नसल्याचा धक्कादायक खुलासा आपल्या ‘व्हिटनेस’ या आत्मचरित्रात केला आहे.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकने आपल्या कारकीर्दीतील संघर्षांना सामोरे आणताना ‘व्हिटनेस’ या आत्मचरित्रात केलेले धक्कादायक खुलासे खळबळ माजविणारे ठरणार आहेत. तिने आपल्या शालेय जीवनात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून केलेले कृत्य समोर आणले आहे.

माझे शिक्षक मला कोणत्याही वेळी घरी बोलवायचे आणि कधी कधी ते मला स्पर्श करण्याचाही प्रयत्न करायचे. मला ट्युशनला जायला भीती वाटायची, पण मी ही गोष्ट माझ्या आईबाबांनी कधीही सांगू शकली नाही; कारण मला ही माझीच चूक वाटत होती, असे अंगावर शहारे आणणारे सत्य साक्षीने आपल्या आत्मचरित्रात परखडपणे मांडले आहे.

तसेच साक्षीने आपल्या पुस्तकात बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटला आशियाई स्पर्धांच्या चाचणीसाठी दिलेल्या सवलतीने सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाच्या आंदोलनाची प्रतिमा मलिन झाल्याचेही सांगितले. या सवलतीमुळे बजरंग आणि विनेशबरोबर सुरू असलेले आंदोलन लोकांना स्वार्थासाठी सुरू असल्याचे वाटू लागले. काही जवळच्या लोकांनी या दोघांच्या मनात स्वार्थी विचार भरायला सुरुवात केली. त्यामुळे आमच्या आंदोलनावर त्याचा वाईट प्रभाव पडल्याचेही तिने आत्मचरित्रात मांडण्याचे धाडस दाखवले आहे.