मुंबईच्या विजय महोत्सवाला प्रारंभ, महाराष्ट्रावर 9 विकेट राखून महाविजय; आयुष म्हात्रे सामनावीर

बडोद्याविरुद्ध सलामीच्याच सामन्यात पराभवाची झळ सोसणाऱ्या रणजी विजेत्या मुंबईने दुसऱ्याच सामन्यात आपला विजय महोत्सव प्रारंभ केला. मुंबईने पहिल्या दिवशी पहिल्या सत्रातच महाराष्ट्राचा पहिला डाव 126 धावांत गुंडाळून आपला विजय निश्चित केला होता. फक्त त्यावर आज पहिल्या सत्रात शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राचे 74 धावांचे माफक लक्ष्य आयुष म्हात्रेची एकमेव विकेट गमावत पार पाडले. आपले पहिलेवहिले रणजी शतक झळकवताना 176 धावा फटकावणाऱ्या आयुष म्हात्रेने सामनावीर पुरस्कारही पटकावला.

मुंबईच्या माऱ्यापुढे महाराष्ट्राचा डाव 126 धावांवर कोलमडल्यावर आयुष म्हात्रे (176), श्रेयस अय्यर (142) यांच्या तडाखेबंद शतकांनी संघाला 441 अशी दमदार धावसंख्या उभारून दिली आणि त्यासोबत 315 धावांची निर्णायक आघाडीही घेतली. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड (145), अंकित बावणे (101) आणि सचिन धस (98) यांच्या अप्रतिम फलंदाजीने महाराष्ट्राला दुसऱ्या डावात 388 अशी जोरदार धावसंख्या उभारून दिली होती. पण या तिघांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा एकही आघाडीचा फलंदाज मुंबईच्या गोलंदाजीपुढे उभा राहू शकला नाही. त्यामुळे महाराष्ट्र केवळ 74 धावांची आघाडी मिळवू शकला. परिणामतः मुंबईचा विजय निश्चित होता. पृथ्वी शॉने 5 चौकारांसह नाबाद 39 धावा केल्या आणि हार्दिक तामोरेने नाबाद 21 धावा ठोकल्या. आयुष म्हात्रे 15 धावांवर बाद झाला.

मुंबईची गाठ त्रिपुराशी आणि महाराष्ट्र मेघालयाशी भिडणार

रणजी विजेत्या मुंबईला सलामीच्याच लढतीत बडोद्याविरुद्ध हार सहन करावी लागली होती, तर महाराष्ट्र आणि जम्मू-कश्मीर यांच्यातील सामना अनिर्णितावस्थेत सुटला होता. मुंबईने दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राचा सहज पराभव करत गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले, तर महाराष्ट्र एका गुणासह सातव्या क्रमांकावर आहे. आता महाराष्ट्राला दुबळ्या मेघालयाविरुद्ध आपल्या विजयाचे खाते उघडण्याची नामी संधी आहे. तसेच मुंबई त्रिपुराशी भिडणार आहे. त्रिपुरानेही कालच मेघालयाचा डावाने पराभव केला आहे. हा विजय विजयी संघाला गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचविणार आहे.