महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. काँग्रेसच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा कोणताही तिढा नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे भाजपचे षडयंत्र आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
महाविकास आघाडीत चर्चेद्वारे अनेक जागांचा तिढा सोडवण्यात आला आहे. आता फक्त सात ते आठ जागांवर निर्णय घेणे शिल्लक आहे. त्याबाबतही चर्चा सुरू आहे. उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या जागांचा तिढा सुटलेला असेल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. आमची पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. जागावाटपाबाबत मार्ग कसा काढायचा यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात निवडणुकांसाठी भाजप घाबरले आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचे त्यांचे षडयंत्र सुरू आहे. त्यासाठी ते प्रसारमाध्यमांमध्ये काही खोट्या बातम्या पेरत आहे. जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एसंघपणे लढणार आहे. महाविकास आघाडी म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, तुटेगा नही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.