महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 99 जणांची नावे आहेत. या यादीत मुंबईतील 13 विद्यमान आमदार आहेत. मात्र, यादी जाहीर झाल्यानंतर काही इच्छुकांचा यादीत समावेश नसल्याने त्यांचे टेन्शन वाढले आहे. या यादीत मुंबईत वर्सोवा येथील डॉ. भारती लव्हेकर, बोरीवली येथील सुनील राणे आणि घाटकोपर पूर्व येथील पराग शाह यांचा समावेश नसल्याने हे तीन आमदार वेटिंगवर आहेत. त्यांच्यासह अनेक इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे.
भाजपने एकाच घरात दोन जणांना उमेदवारी दिल्याने हादेखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचे मोठे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम येथून उमेदवारी दिली आहे. शेलार यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री अस्लम शेख यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे. लोकसभेला मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपकडून तत्कालीन खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करत आमदार मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर नाराजी नाट्य रंगले होते. मात्र, आता पुन्हा कोटेचा यांना संधी देण्यात आली आहे. या घडामोंडीमुळे भाजपत नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.