जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ल्यात सहा जण ठार

विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कश्मीरात दहशतवादी हल्ले कमी झाले नाहीत. रविवारी रात्री गांदरबल जिह्यातील गगनगीर भागात दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. बोगदा प्रकल्पात काम करणाऱ्या पाच कामगारांसह एका डॉक्टराचा या मृतांत समावेश आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून, त्यांना श्रीनगर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे.

रात्री उशिरा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक व्ही. के. बिर्डीही घटनास्थळी पोहचले. काश्मीरचे आयजीपी व्ही. के. बिर्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दहशतवादी हल्ला झालेला परिसर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा मतदारसंघ असलेल्या गांदरबल विधानसभेत आहे.