अयोध्येचा निकाल देताना देवाने मार्ग दाखवला, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे विधान

जेव्हा अयोध्या खटल्याचे काम माझ्याकडे आले तेव्हा आम्ही तीन महिने त्यावर विचार करत होतो. क्रित्येक वर्षे ज्या विषयावर मार्ग निघाला नाही, त्यावर मार्ग कसा शोधायचा यावर मी विचार करायचो. मी दररोज देवपूजा करताना यावर मार्ग कसा काढायचा याविषयी प्रार्थना करायचो. देवावर आपली श्रद्धा, आस्था असेल तर कठीण प्रसंगी देव नेहमी आपल्याला मार्ग शोधून देतो. तसेच घडलं आणि तीन दशकांपासून चालत आलेला राम जन्मभूमीबाबतचा खटला पाच वर्षांपूर्वी सोडवण्यात सर्वेच्च न्यायालयाला यश मिळाले, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रामजन्मभूमीबाबतच्या खटल्यावर भाष्य केले आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या खेड तालुक्यातील मूळगावी कनेरसर येथे भेट दिली. ग्रामस्थांच्या वतीने सरन्यायाधीश आणि पत्नी कल्पना चंद्रचूड यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सरन्यायाधीश म्हणाले, पूर्वजांच्या पुण्याईमुळे मी इथवरचा प्रवास करू शकलो. यमाई देवीच्या कृपेने मी भारताचा सरन्यायाधीश झालो. न्यायालयात काम करत असताना कित्येक वेळा अशी प्रकरणे समोर येतात, जी सोडवणे अवघड असते. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. अयोध्या खटल्यावर तीन महिने आम्ही सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे जो वाद कोणी सोडवू शकले नव्हते, तेच प्रकरण आमच्यापुढे येऊन ठेपले होते. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा, असा प्रश्न पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली आहे, असे ते म्हणाले.

z माझ्या पूर्वजांचा, गावाचा आणि मातीचा मला कायम अभिमान आहे, असे सांगत त्यांनी वडिलोपार्जित चंद्रचूड वाडय़ाला, जुन्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, ग्रामदैवत कुलस्वामिनी यमाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. मी लहानपणी येथे यायचो. सध्या गावात बदल झाला आहे. आपल्या मातीचा वारसा पुढे चालवत एक एक पिढी बदल स्वीकारत पुढे स्थलांतर करते, असेही ते म्हणाले.