निवडणूक कामात कसूर; अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

निवडणूक कामात कसूर केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीत प्राथमिक टप्प्यात 85 पेक्षा अधिक वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही जबाबदारी सोपविण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांनी अधिकृत कर्तव्याचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल झाली. या तक्रारीअन्वये सावनेर येथील पोलीस ठाण्यामध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रवींद्र होळी यांनी सावनेर पोलिस ठाण्यात सदर तक्रार दाखल केली. नगर परिषदेची सुभाष प्राथमिक शाळा, सावनेर येथील सहाय्यक शिक्षक जयप्रकाश जगराम हेडाऊ यांची यादी भाग क्रमांक 135 करिता मतदान पेंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या क्षेत्राचे तलाठी तथा पर्यवेक्षक यांनी 12-ड फॉर्म भरून घेण्यास सांगितले असता हेडाऊ यांनी सदर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. आदेश घेण्यास त्यांनी नकार दिला. अरेरावीचे असभ्य वर्तणूक केली. यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

निवडणूक कामाच्या आदेशाचे पालन करण्याच्या त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी आपल्या कर्तव्यात टाळाटाळ केली. याबाबत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी समज देऊन पाहिली. त्यांना वाजवी संधी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे खलाटे यांनी सांगितले

निवडणूक विभागातर्फे सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी ही राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. याचबरोबर कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय प्रचारात सहभागी होता कामा नये. याबाबत निवडणूक विभागामार्फत स्वयंस्पष्ट आदेश जारी केले आहे. आपली जबाबदारी टाळण्यासाठी कोणीही आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला.