संक्रमण शिबिराचे भाडे थकवणाऱ्या विकासकांची खैर नाही; म्हाडा ऍक्शन मोडवर, विकासकाला काम बंदची नोटीस धाडणार

काही विकासकांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिराचे 65 कोटी रुपयांहून अधिक भाडे थकवल्याचे समोर आले आहे. अशा विकासकांविरोधात म्हाडा ऍक्शन मोडवर आली असून संबंधित विकासकांना काम बंदची नोटीस पाठवणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या जमिनीवर त्या विकासकाचे काम सुरू असल्यास त्यांना ते करता येणार नाही. त्यानंतरदेखील विकासकांनी भाडे न भरल्यास त्यांच्यावर अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई शहरात म्हाडाची 34 संक्रमण शिबिरे असून त्यामध्ये सुमारे 20 हजार घरे आहेत. उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास करताना रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हाडातर्फे संक्रमण शिबिरात घरे उपलब्ध करून दिली जातात. विकासकांनी मागणी केल्यास त्यांनाही संक्रमण शिबिरातील घरे दिली जातात. म्हाडाकडून संक्रमण शिबिरातील मूळ रहिवाशांकडून दरमहा 500 रुपये, तर घुसखोरांकडून तीन हजार रुपये भाडे आकारले जाते. विकासकांकडून सहा हजार रुपये भाडे घेतले जाते त्यात दरवर्षी 10 टक्के वाढ केली जाते.

भाडेकरू आणि रहिवाशांनी संक्रमण शिबिराचे आतापर्यंत जवळपास 188 कोटी रुपये भाडे थकवले आहे. त्यापैकी पाच ते सहा विकासकांनी 65 कोटी रुपये भाडे थकवले आहे. थकीत भाडेवसुलीसाठी म्हाडाकडून विकासकांसह भाडेकरूंना नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.