न्यूझीलंडचे जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार, 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्यूझीलंडच्या महिला टी-20 क्रिकेटच्या नव्या जगज्जेत्या

महिला टी-20 वर्ल्ड कपच्या पदार्पणीय स्पर्धेत न्यूझीलंडचे जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. त्यानंतर तब्बल 15 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या न्यूझीलंडच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकन संघाचा 32 धावांनी पराभव करत आपले जगज्जेतेपदाचे स्वप्न अखेर साकार केले तर पुरुष संघाप्रमाणे दक्षिण आफ्रिकन महिला संघही चोकर्स ठरल्या. सलग दुसऱयांदा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतवर्षी ऑस्ट्रेलियानेही त्यांचा अंतिम फेरीत पराभव केला होता. न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केर संघाच्या जगज्जेतेपदाची शिल्पकार ठरली. तिने अष्टपैलू खेळ करत अंतिम फेरी जिंकून दिली, तर स्पर्धेची सर्वोत्तम खेळाडूही तीच ठरली.

आज महिला क्रिकेटला नवी जगज्जेती लाभणार असल्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. उपांत्य फेरीत सामन्यात दणदणीत विजय मिळवत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. दोन्ही संघ दुसऱयांदा अंतिम फेरीत पोहोचले होते. पहिल्या अंतिम सामन्यात दोघांनाही पराभवालाच सामोरे जावे लागले होते.

कर्णधार लॉरा वॉलवार्ड्टने टॉस जिंकून न्यूझीलंड फलंदाजी दिली. पण आफ्रिकन महिला न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. सुझी बेट्स (32), अमेलिया केर (43) आणि ब्रुक हॅलीडे (38) यांनी वेगवान खेळ करत संघाला 158 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर आफ्रिकन फलंदाजांना हे आव्हान पेलवलेच नाही.

कर्णधार वॉलवार्ड्टने 5 चौकार खेचत 33 धावांची आक्रमक खेळी करून दाखवली. तिने तॅझमिन ब्रिट्ससोबत 51 धावांची सलामी देत आफ्रिकेला पुढे ठेवले होते, पण ही जोडी फुटल्यानंतर आफ्रिकन फलंदाजीला कोणाचाच आधार लाभला नाही. त्यामुळे जगज्जेतेपदापासून आफ्रिकन संघ दूरवर फेकला गेला.

फलंदाजीत धुवांधार फलंदाजी करणाऱ्या अमेलियाने गोलंदाजीत वॉलवार्ड्ट, अॅनेक बोश आणि अॅनरी डर्कसन यांच्या विकेट न्यूझीलंडला जगज्जेतेपदासमीप नेले. आघाडीच्या फलंदाजांच्या अपयशामुळे आफ्रिकेने सामना आधीच गमावला होता.

जगज्जेतेपदाची औपचारिकता न्यूझीलंडने 20 व्या षटकात पूर्ण केली. आफ्रिकन महिला पूर्ण 20 षटके खेळूनही 126 धावाच करू शकली. न्यूझीलंडच्या जगज्जेतेपदाची खरी विजेती असलेल्या अमेलियाने स्पर्धेत 135 धावांसह 15 विकेटही टिपण्याचा पराक्रम केला.