मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णांना भाजपमध्ये केले सामील, झोपेतून उठवून मागितले ओटीपी

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायला आलेल्या रुग्णांना भाजपमध्ये सामील केले आहे. गुजरातमधली ही घटना असून रुग्णांना झोपेतून उठवलं आणि त्यांच्याकडून ओटीपी मागून त्यांना भाजपचा सदस्य केले आहे. एका रुग्णाने या घटनेचा व्हिडीओ व्हायरल केला आहे.

राजकोटच्या जुनागढ मध्ये कलमेश ठुम्मर हे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रणछोडदास ट्रस्ट रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत 350 रुग्णही दाखल होते. तेव्हा तिथे भाजपचा एक कार्यकर्ता आला आणि त्याने सर्व रुग्णांचे मोबाईल नंबर घेऊन त्यांना भाजपचे सदस्य बनवले.

कमलेश ठुम्मर म्हणाले की रात्री आम्ही झोपले होते तेव्हा एक व्यक्ती वॉर्डमध्ये आली. त्याने सगळ्यांकडे मोबाईल नंबर घेऊन ओटीपी विचारत होता. मलाही त्याने नंबर मागितला आणि ओटीपी विचारला. मी ओटीपी दिल्यावर मला भाजपचा सदस्य झाल्याचा मेसेज आला. त्याला मी विचारलं की मला भाजपचा सदस्य का बनवतोय? त्यावर तो म्हणाला की याशिवाय कुणाचाही उद्धार होणार नाही. तेव्हा मी त्याचा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल केला.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रणछोड दास ट्रस्टचे शांती बाडोलिया यांनी हा माणूस आपल्या संस्थेचा नसल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपने अशा प्रकारे सदस्य बनवलेच नाही असे म्हटले आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करू असेही म्हटले आहे.