राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी याद्या जाहीर करण्याची लगबग सुरू झाली आहे. महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि जनतेच्या पैशांची सुरू असलेली उधळपट्टी यावरून काँग्रेस नेत्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. महायुतीत आलोबल नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुती मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास घाबरत आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. मात्र, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यास महायुती घाबरत आहे. भ्रष्ट महायुती सरकारने महाराष्ट्र विकायला काढला असून जमिनी विकत आहेत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे आणि योजना दूतच्या नावाखाली जनतेच्या पैशावर हे सरकार भाजपचा प्रचार करत आहे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर योजनादूतसह सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द केले आहेत, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर हल्लााबोल केला.
पांचज्यन या संघाच्या मुखपत्रात बाबा सिद्दिकींचा कुख्यात माफिया दाऊदशी संबंध जोडल्याच्या संदर्भात नाना पटोले म्हणाले की, देशभरातील कोणताही गुन्हेगाराने भाजपात प्रवेश केला तर ते स्वच्छ होतात व संघ संघटनाही त्यांचे स्वागत करते. ज्यांच्याविरोधात गाडीभर पुरावे होते ते भाजपात आले, ज्यांना चक्की पिसिंग करणार होते त्यांना भाजपात घेतले त्यावर संघ काहीच बोलला नाही. भाजपा सरकारबरोबर बाबा सिद्दिकी आले, एकनाथ शिंदे आले व ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी संघ का बोलला नाही. आता बाबा सिद्दिकींची हत्या झाल्यानंतर त्यांचा दाऊदशी संबंध दाखवण्याचा प्रयत्न ते का करत आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्यावरही भाजपाने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याच नवाब मलिक यांचे मतदान भाजपाला चालते. भाजपाचे व संघाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी केली.