सलग सुट्ट्यांमुळे पुणेकरांची ‘शॉपिंग’ साठी गर्दी

शनिवार-रविवार जोडून असलेली सुट्टी, त्यात बोनस जमा झाल्याने अनेकांनी आज (दि. 19) खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. शहरातील रविवार पेठ, भोरे आळी, तुळशीबाग यांसह अन्य ठिकाणी ग्राहकांनी दिवाळीची ‘शॉपिंग’ करण्यास पसंती दिली. ग्राहकांची गर्दी आणि त्यात दुचाकी पार्किंगमुळे शहरातील प्रमुख पेठांमध्ये मोठी वाहतूककोंडी झाली होती.

दिवाळी सण अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. 28 ऑक्टोबरपासून दिवाळीला प्रारंभ होत आहे. दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेकांनी सुट्टीच्या दिवशीच शॉपिंग उरकून घेतली. आकाशकंदील, रांगोळीचे साहित्य, सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याने दुकाने फुलली आहेत. आज शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्यामुळे रस्त्यावरून चालनेदेखील कठीण झाले होते. त्यात रस्त्यावरच अनेकांनी दुचाकी पार्क केल्यामुळे वाहतूककोंडी झाली होती.

दिवाळी हा सण प्रामुख्याने प्रकाशाचा सण आहे. त्यामुळे दिवाळीत सजावटीमध्ये अनेकांकडून विद्युत रोषणाईला प्राधान्य दिले जाते. घरगुती सजावटीसाठी वापरात येणाऱ्या विद्युत माळा खरेदी करण्यासाठी रविवार पेठेसह, नाना पेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या आकर्षक विद्युतमाळा विक्रीसाठी उपलब्ध असून, ग्राहकांकडून प्रामुख्याने पणती, स्वस्तिकाच्या आकाराच्या, छोटे दिवे असलेल्या, मल्टीकलर विद्युत माळांना पसंती मिळत आहे. तसेच, पाण्यावर प्रज्वलित होणाऱ्या विद्युत दिव्यांनीदेखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. साधारण 150 रुपयांपासून ते 500 ते 600 रुपयांपर्यंत या आकर्षक विद्युतमाळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवार पेठेमध्ये छोट्या-मोठ्या आकाशकंदिलांची रेलचेल पाहायला मिळत आहे. विविध प्रकारचे आकर्षक नक्षीकाम असलेले आकाशकंदीलविक्रीसाठी उपलब्ध झाले असून, हे आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, दिवाळीनिमित्त शॉपिंग करण्याची महिलांची तुळशीबागेत विशेष गर्दी पाहायला मिळाली.

दिवाळीसाठीच्या पणती खरेदीसाठी कुंभारवाड्यात गर्दी केली होती. लाल मातीपासून तयार करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या पणती खरेदी करण्यास पुणेकरांनी पसंती दिली. मातीच्या पणतीला केलेले आकर्षक नक्षीकाम, या नक्षीकामात भरलेले सुरेख रंग ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असून, असे आकर्षक रंगीबेरंगी नक्षीकाम असलेल्या पणती खरेदी करण्यास पुणेकरांनी पसंती दिली.

पेठांमध्ये वाहतूककोंडी

दिवाळी सणानिमित्त नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मध्यवस्तीतील पेठांमधील मुख्यतः लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाल्याने अंतर्गत गल्लीबोळातदेखील कोंडी झाली होती. शनिवारी (दि.19) रोजी दिवसभर वाहतूककोंडी झाल्याने नागरिकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यातच नारायण पेठेतील काही रस्त्यावर खोदाईची कामे सुरू केल्याने या कोंडीत आणखीच भर पडली आहे. शनिवारी- रविवारची सुट्टी जोडून आल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर आले होते. विशेषतः लक्ष्मी रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. यामुळे आजूबाजूच्या गल्ली बोळांमध्येही वाहतूककोंडी झाली आहे. प्रचंड मनस्ताप झाल्याने वाहनचालक आणि नागरिक चांगलेच त्रासले होते. काही ठिकाणी एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यामुळे चांगलीच बाचाबाची झाली. ऐन सणाच्या खरेदीच्या दिवशी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावरील शाळांची मैदाने पार्किंगसाठी घेतली जातात. मात्र, यंदा याबाबतचे नियोजन करण्यात आलेले नाही.