मृत्यू रोखण्यासाठी हेल्मेटसक्ती करावी; सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समिती अध्यक्षांच्या सूचना

रस्ते अपघातात दुचाकी वाहनचालकांच्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाहनचालकाने स्वतः आणि सोबत बसलेल्या व्यक्तीने रस्ता सुरक्षा मानकांची पूर्तता करणाऱ्या हेल्मेटचा वापर करावा. त्यासाठी प्रशासनाने दुचाकी वाहनचालकांसाठी हेल्मेटसक्ती करावी तसेच वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष, सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी दिल्या.

विधान भवनातील रस्ता सुरक्षा समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, शेखर सिंह, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण आदी उपस्थित होते.

बेदरकारपणे आणि बेजबाबदारपणे वाहने चालवून निष्पाप नागरिकांच्या बळींच्या संख्येत वाढ होत असून, ही गंभीर बाब आहे. निष्पाप नागरिकांचे वाहन अपघातात बळी जाऊ नयेत, यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी, त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश सप्रे यांनी दिले. सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहितीचे सादरीकरण करून विशेषतः मुंबई-पुणे महामार्गावर 30 टक्क्याने व समृद्धी महामहार्गावर 33 टक्क्याने अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याची माहिती यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.

‘अपघातमुक्त वारी ‘अभियानाचे कौतुक

पुणे आरटीओ कार्यालयाने यंदा पुणे ते पंढरपूर वारीमध्ये ‘अपघातमुक्त वारी अभियान’ राबवून जनजागृती केली. ठिकठिकाणी पोस्टर तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. पुणे आरटीओ तसेच परिवहन विभागाकडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबाबत निवृत्त न्यायमूर्ती सप्रे यांनी समाधान व्यक्त केले.