पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! पारनेरमध्ये अजित पवारांच्या सभेत शेतकरी संतप्त

पंचवीस वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे झालेल्या पाणी परिषदेत एक टीमएसी पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले? तुम्ही आश्वासन पाळत नाही, असे संतप्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पारनेर येथे सभेत सुनावले. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी फलक झळकवले. यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

दरम्यान, भरसभेत घोषणा देणाऱ्या शेतकऱ्यांना, ‘तुम्हाला लंकेंनी पाठविले का?’ अशी विचारणा करीत, ‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी,’ असे अजित पवार यांनी म्हटल्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले.

पारनेर बाजारतळावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत संतप्त शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आवाज उठविल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माधव लामखडे, विजय औटी, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

आमच्या उमेदवाराला निवडून दिले तरच विकासकामे होतील

नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सभास्थानी पोहचलेल्या अजित पवार यांनी आल्याबरोबर लगेच ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. 38 मिनिटे केलेल्या भाषणात पवारांनी आमच्या उमेदवाराला निवडून दिले तरच विकासकामे केली जातील, असा इशारा दिला. याची सभास्थानी मोठय़ा प्रमाणात चर्चा सुरू होती.

जलसंपदामंत्री असताना दिले होते आश्वासन

25 वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे झालेल्या पाणी परिषदेत कुकडी प्रकल्पातील तालुक्याच्या पठार भागाचे हक्काचे 1 टीएमसी पाणी देण्यासाठी उपसा जलसिंचन योजना राबविण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदामंत्री असताना अजित पवार यांनी केली होती. या घोषणेचे काय झाले? असा सवाल पवारांचे भाषण सुरू असताना कान्हूर पठार परिसरातून आलेल्या शेतकऱयांनी उपस्थित केला. तशा आशयाचे फलकही शेतकऱयांच्या हातात होते. यावेळी ‘मी या विषयावर बोलणार आहे. मात्र, भाषणात व्यत्यय आणणे बरोबर नाही,’ अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. शेतकरी आणखी संतप्त झाले. त्यांनी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी घोषणाबाजी केली.

इच्छुकांच्या समर्थकांना भरला दम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत इच्छुक उमेदवारांचे समर्थक आपआपल्या नेत्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी घोषणाबाजी करीत होते. या कार्यकर्त्यांनाही अजित पवार यांनी दमबाजी केली. ‘ज्याच्या नावाने घोषणा दिल्या जातील, त्या इच्छुकाला उमेदवारी देणार नाही,’ अशी दमबाजी करीत, ‘मी अजित पवार बोलतोय, दुसरा कोणी नाही, याचे भान ठेवा,’ असा इशारा कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे सभास्थानी तब्बल दोन तास ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.