शहांनी मिंधे-अजित पवारांना लपेटले; ज्याचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री, निर्णय निकालानंतरच

महायुतीचे सरकार सत्तेवर आले तर मुख्यमंत्री कोण होईल हे निवडणूक निकालानंतरच ठरेल. ज्यांचे जास्त आमदार त्यांचाच मुख्यमंत्री होईल. कोणाच्याही चेहऱयावर विधानसभेची निवडणूक लढविली जाणार नाही, असे स्पष्ट भाषेत सांगत पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री मिंधे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुंडाळले.

महायुतीच्या जागावाटप फार्म्युल्यात ज्या जागा मिळतील त्यावर चांगली कामगिरी करा. गेल्या अडीच वर्षांत भाजपने तुम्हाला सत्ता दिली. त्यासाठी आम्ही त्याग केला आहे, या शब्दांत अमित शहांनी शिंदे-पवारांना सुनावले.

आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल या अनुषंगाने शुक्रवारी मध्यरात्री पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, कोणत्याही तोडग्याशिवाय ही बैठक संपली. एकनाथ शिंदे व अजित पवार यांची राजकीय गरज संपल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले. दोन्ही नेत्यांना भाजपाने कोणतेही ठोस आश्वासन तर दिले नाहीच, शिवाय भाजपने तुमच्यासाठी मोठा त्याग केला आहे. आता तुम्ही त्यागाला तयार रहा, अशा कडक सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे दिल्लीकरांच्या मेहरबानीवर मुख्यमंत्री झालेल्या मिंध्यांची व अजित पवारांची मोठी दाणादाण उडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेते उपस्थित होते. यावेळी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी मिंध्यांनी विनंती केली. मात्र, अमित शहांनी ती क्षणार्धात धुडकावून लावल्याचे त्रांनी सांगितले. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत आम्ही त्म्हाला मोठा त्याग करून मुख्यमंत्रीपद दिले. त्यामुळे आता तुम्ही त्यागासाठी तयार रहा, असा इशारा शहा यांनी मिंध्यांना दिला. तर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुम्ही प्रचंड अडचणीत असताना आम्ही तुम्हाला सत्तेत आणले त्याची जाणीव ठेवा, अशा स्पष्ट शब्दांत अमित शहा यांनी अजित पवारांनाही सुनावले. महायुतीचा मुख्यमंत्री निवडणूक निकालानंतर ठरेल. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र लक्षात ठेवा, असे सांगत अमित शहा यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळेल याची आस लावून बसलेल्या मिंध्यांच्या मनोरथावर पाणी फेरल्याचे मानले जात आहे.

महायुतीचा पेच 35 जागांचा

महायुतीच्या जागावाटपाचा पेच 35 जागांवर अडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. बहुतांश जागांवर सहमती झाली असली तरी 35 जागांवर मोठय़ा प्रमाणावर वाद आहेत. हे वाद मुंबईच्या पातळीवरच मिटविण्याची सूचना अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना केलेली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अर्ध्या रात्री अजित पवार माघारी, मिंधे पुन्हा गुवाहाटीला

मध्यरात्रीची बैठक आटोपल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्रीपदावर उदक सोडावे लागणार या नुसत्या शक्यतेनेच अस्वस्थ झालेले मिंधे हे तातडीने गुवाहाटीला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. मिंधे त्यांच्या खासदार पुत्राच्या निवासस्थानी दुपारी 1 वाजता पत्रकारांना भेटणार असे सांगण्यात आले होते; मात्र दोन तास उलटून गेले तरी पत्रकारांनाही मिंध्यांचा पत्ता लागला नाही. मिंधे नेमके गेले कुठे याचा तपास पत्रकारही आपापल्या परीने करत होते. मात्र, मिंधे पुन्हा गुवाहाटीला कामाख्या दर्शनासाठी गेल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अमित शहांनी फायर केलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रीतूनच पुन्हा मुंबईत परतल्याचे सूत्रांनी सांगितले.

मी सगळा खर्च करतो, मलाच मुख्यमंत्री करा…

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीचा महायुतीचा सगळा खर्च मी एकटाच करतो. मलाच मुख्यमंत्री करा, असे आर्जव मिंधे करत होते. मात्र, अमित शहा यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारल्यानंतर मिंधे नरमले.