काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काळजी करू नका. महाविकास आघाडीची प्रकृती ठणठणीत आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत, असे चेन्नीथला यांनी ठामपणे सांगितले.
रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, आमदार भाई जगताप, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नसीम खान उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चेन्नीथला म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली. त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे आणि महाविकास आघाडीची प्रकृतीही ठणठणीत आहे. आम्ही एकत्रच आहोत व जागावाटपाच्या संदर्भात आमच्या बैठका सुरूच राहतील.
या 14 मतदारसंघांतील मतदारांची नावे वगळली
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने चौदाहून अधिक विधानसभा मतदारसंघातील हजारो मतदारांची नावे वगळली आहेत.
शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर, धामणगाव रेल्वे, ठाणे या विधानसभांमधील मूळ मतदारांची नावे वगळून बोगस नावे घुसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार, प्रत्येक विधानसभा यादीत 10 हजार बोगस मतदार घुसवले
महाविकास आघाडीच्या जागावाटप बैठकीपूर्वी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, मतदार यादीत गोंधळ निर्माण करण्याचे भाजपचे षड्यंत्र उघड झाले आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपची टीम अधिकृतपणे या कामाला लागली आहे. त्याचे सूत्रधार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. हा तांत्रिक मुद्दा असला तरी महाराष्ट्राच्या भविष्याचा मुद्दा आहे. हे षड्यंत्र आम्ही उधळून लोकांमध्ये जनजागृती करू, वेळ पडली तर महाराष्ट्राच्या मतदारांचा एक विराट मोर्चाही निवडणूक आयोगावर काढावा लागेल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार पराभवाच्या भीतीने मूळ मतदारांची नावे कापत आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश इतर राज्यांतील मतदारांचे आधार कार्ड जोडून प्रत्येक विधानसभा मतदार यादीत दहा हजार बोगस मतदारांची नावे घुसवली जात आहेत. मूळ मतदारांची नावे हटवली जात आहेत, राज्यातील दीडशे मतदारसंघांत घोळ सुरू आहे. राज्यातील काही अधिकारी यात सहभागी आहेत. पेंद्रीय निवडणूक आयोगाला आम्ही ई-मेलही केल्याचे पटोले म्हणाले.