इस्रायल- हमास, पॅलेस्टाईन, इस्रायल लेबनॉन, इराण या राष्ट्रातील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. इस्रायलने त्यांच्या कारवाईला गती दिली आहे, तसेच आमचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. देशाच्या शत्रूंचा खात्मा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा निर्धार इस्रायलने व्यक्त केला होता. त्यानंतर शनिवारी हिजबुल्लाने लेबनॉनमधून इस्रायलवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्या पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराजवळ करण्यात आला. इस्रायलमधील हैफा सीझेरिया भागात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे लेबेनॉनच्या ड्रोनने इस्रायलच्या सुरक्षा व्यवस्थेला चकवा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली. पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराजवळ ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यान पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी निवासस्थानी नव्हत्या. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे ड्रोन खुल्या जागेत पडल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी सकाळी हाइफा क्षेत्रात वॉर्निंग सायरन या ड्रोनमुळे वाजत होते. दोन ड्रोनचा शोध घेण्यात यंत्रणेला यश आले. मात्र या ड्रोनने सुरक्षा यंत्रणेला चकवा दिला आणि पंतप्रधानांच्या निवासास्थानाजवळ ड्रोनचा स्फोट घडवण्यात आला. हा ड्रोन लक्ष्यावर अचूक मारा करण्यात सक्षम होता. आमची हवाई संरक्षण प्रणाली ड्रोनला रोखण्यात अपयशी ठरल्याने हा हल्ला झाला. सुरक्षा यंत्रणेत ही मोठी चूक असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.