मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सरकारने सध्या थांबवली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला व बालकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच जमा झाले आहेत. दुसरीकडे दहा लाख महिलांच्या खात्यात अद्याप या योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत.
सकाळ या वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. मतदारांना आर्थिक लाभ देऊन प्रभाव टाकणाऱ्या योजना बंद कराव्यात असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. तेव्हा अशा कुठल्या योजना आहेत अशी विचारणा आयोगाने केली होती. तेव्हा राज्य शासन लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात थेट रक्कम जात असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा ही योजना तत्काळ थांबवण्याचे आदेश निघाले. महिला व बाल कल्याण विभागाने या योजनेचे निधी वितरण चार दिवसांपूर्वी थांबवल्याची माहिती आयोगाला दिली. राज्यात आचारसंहिता लागली आहे, त्यामुळे राज्य सरकारने ही योजना थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.