>> प्रा. अनिल कवठेकर
गूढकथा या नेहमीच रंजक असतात. ‘उलझ’ ही एक अशीच रंजक कथा आहे. इंडियन फॉरेन सर्व्हिसेस ही आपल्या देशातील अत्यंत मान्यताप्राप्त अशी सेवा आहे. ज्या व्यक्तीमध्ये समस्या सोडवणुकीची उच्च क्षमता असते, त्या व्यक्ती या अधिकारी पदापर्यंत पोहोचतात.
सुहाना नावाच्या अत्यंत हुशार व परदेशात इंडियन फारेन सर्व्हिसेसमध्ये काम करण्याची संधी मिळालेल्या तरुणीची ही कथा आहे. तिचे वडील हे एकेकाळी देशाच्या उच्च सेवेमध्ये होते. ती या पदापर्यंत पोहोचली आहे ते वडिलांच्या यशामुळे नाही तर स्वतच्या कर्तृत्वामुळे. पण वडिलांच्या यशस्वी कारकीर्दीमुळे, त्यांच्या भाटिया या आडनावामुळे तिला फायदा झाला असल्याचे आणि म्हणून तिला यूकेमध्ये जाण्याची संधी मिळाली असल्याचा सगळ्यांचा समज आहे. ती अतिशय तरुण आहे. स्वत बाबत तिला आत्मविश्वास आहे. काठमांडूची डील ती अत्यंत हुशारीने करते. त्यामुळे तिच्यावर तिच्या सीनिअर्सचा विश्वास आहे, पण तिच्या वडिलांना अजून तिचा विश्वास वाटत नाही.
ती यूकेमध्ये येते आणि प्रथमदर्शनीच एकाच्या प्रेमात पडते. परदेशात आल्याबरोबर ती ज्या वेगाने प्रेमात पडते तिथेच आपल्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकते. ही प्रेमात पाडणारी व्यक्ती नक्की कोणीतरी वेगळी असणार आणि घडतंही तसंच. तो मनुष्य तिच्या सोबतच्या क्षणांचे छुप्या कॅमेऱयाने व्हिडीओ काढतो. ते तिला तिच्याच ऑफिसमध्ये येऊन दाखवतो आणि तिला सांगतो की, मला तुझ्याकडून काही महत्त्वाचे पेपर्स हवे आहेत. तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडतो की, आपण ज्या जबाबदारीने इथे आलेलो होतो, त्या जबाबदारीने आपण वागलेलो नाही. बरोबर 29 व्या मिनिटाला खरे कथानक सुरू होते. चित्रपट रंजकतेकडे, गूढतेकडे, पुढे काय होणार या उत्सुकतेकडे झुकू लागतो.
यूकेमध्ये आल्यानंतर ती पहिल्यांदा जेव्हा त्याच्या मोटरसायकलवर बसते तेव्हा तिला घेऊन जाणारा तिचा ड्रायव्हर तिला सुचवतो की, तू जाऊ नकोस, पण ती त्याचे ऐकत नाही. मोटरसायकलवरचा प्रवास तिच्या आयुष्यामध्ये एक मोठे वादळ आणतो. मदत कोणाची घ्यायची, सांगायचं कुणाला. ती पूर्णत फसलेली असते. तिच्या ड्रायव्हरच्या ते लक्षात येतं. तो तिला सांगतो, जर मदत मागितली तर मदत मिळेल. तेव्हा ती त्याच्याकडे मदत मागते. तिच्या वडिलांना राष्ट्रपतीच्या हस्ते एक मोठा सन्मान मिळणार असतो. तो पाहण्यासाठी तिला देशात परत यायचं असतं. यूकेच्या विमानतळावर तिचा ड्रायव्हर तिला सोडतो. ती ट्रॉली घेऊन निघते तेव्हा तिला त्या ब्लाकमेलर व्यक्तीचा फोन येतो. ड्रायव्हर गाडीला पाठ टेकून तिच्याकडे पाहत असतो. कॅमेरा अँगल असा लावलाय की, तिचं पुढे पुढे येणं आणि तिच्या मागे तिच्या कारला टेकून उभा असलेला ड्रायव्हर हे एकाच वेळी आपल्याला दिसतात.
तो ब्लॅकमेलर तिला पुन्हा कॉल करतो तेव्हा त्याच्याबरोबर बोलतानाचे तिचे फोटो कोणीतरी काढलेले असतात. तेच फोटो न्यूज चॅनलवर येतील असं तो तिला सांगतो. पुन्हा तिचा गोंधळ उडतो. आपल्या छोटय़ाशा चुकीमुळे आपण किती मोठय़ा संकटात सापडलो आहोत, याची तिला स्पष्ट जाणीव होते. तिच्या वडिलांना एक मोठी जबाबदारी देशातर्फे देण्यात येणार असते. ते राष्ट्रपती भवनात पोहोचण्यापूर्वी 48 तासांच्या आत त्यांना पाकिस्तानामध्ये काम करणाऱया हिंदुस्थानी एजंटची माहिती हवी असते. पुन्हा तेच 48 तास आणि आधी मागितलेले 72 तास, ती त्याच्या जाळ्यात पूर्ण अडकलेली आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱयाने कसे वागू नये, हे पदोपदी सांगणारा हा चित्रपट आहे.
तिला वाटतं की, आपण आत्महत्या करावी. तिच्या वडिलांनी ज्या विश्वासाने देशात नाव कमावलेलं असतं, ते केवळ तिच्या एका छोटय़ाशा चुकीमुळे धुळीला मिळण्याची वेळ आलेली असते. तिने तिच्या ड्रायव्हरवर विश्वास टाकून त्याला फिंगरप्रिंट घ्यायला सांगते. तिने ते प्रिंट मोठय़ा शिताफीने त्या ब्लॅकमेलरच्या स्पर्शातून घेतलेल्या असतात. तिला त्या फिंगरप्रिंटची माहिती मिळण्याआधीच ती माहिती ब्लॅकमेलरकडे पोहोचलेली असते. ही गोष्ट फक्त तिला आणि ड्रायव्हरला माहीत असते. म्हणजे आता ड्रायव्हरवर विश्वास ठेवणंही शक्य नसतं. कारण तो एक निर्ढावलेला पाकिस्तानी एजंट असतो. समस्येच्या पाव्यूहात ती आता पुरती फसलेली असते. या पाव्यूहातून आपल्याला बाहेर कोण काढणार हा मोठा यक्षप्रश्न तिच्या समोर उभा राहतो. ऑफिसमध्ये तिची विश्वासार्हता संपलेली असते. यादरम्यान सुहानाचा तिच्या वडिलांबरोबर मोबाइलवर एक सुसंवाद होतो. अनुभवामुळे त्यांना तिच्या संकटाची जाणीव होते. एक बाप खचलेल्या मुलीला अत्यंत प्रेमाने आयुष्याचे, आपल्या जबाबदारीचे महत्त्व समजावून सांगतो. इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये असलेला अधिकारी हा सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे आपण कसा विचार करायला हवा. तिच्या मनावर आलेलं आत्महत्येचं मळभ काही क्षणांकरिता दूर होतं.
तो ब्लॅकमेलर एजंट नावे घ्यायला येतो तेव्हा ती त्याच्यावर हल्ला करते आणि त्यात यशस्वी ठरते. तो एक प्रोफेशनल पाकिस्तानी एजंट आहे आणि त्याच्यापुढे ती एक सर्वसामान्य नारी, उच्चपदस्थ अधिकारी असली तरी तिने एखाद्या गुन्हेगाराशी कसं लढायचं याचं प्रशिक्षण घेतलेलं नसतं किंवा तसं प्रशिक्षण त्यांना दिलं जात नसावं. तो तिला गोंधळात टाकून देशभक्ती वगैरे काही नसतं, देशाची बाऊंड्री वगैरे काही नसते, मी पण एक खेळणं आहे आणि तूही एक खेळणं आहेस. दोन्ही देश आपला उपयोग करत आहेत हे तू लक्षात घे. तो तिला आपल्या बोलण्याने वैचारिकदृष्टय़ा हतबल करण्याचा प्रयत्न करतो, पण आता सुहानासुद्धा तयार झालेली आहे. ती चिडते, आाढाsश करते. तिच्या अंत:करणापासून निघालेले ध्वनी तिच्या अभिनयाची परीक्षा घेतात. या ठिकाणी तिच्या आवाजामध्ये तिच्या आईची म्हणजे श्रीदेवीची झलक डोळे बंद करून ऐकल्यास लक्षात येते. जान्हवी कपूर आता एक उत्तम अभिनेत्री म्हणून तयार होत आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची तिसरी डिमांड असते की, त्याला आता हिंदुस्थानमध्ये जाण्यासाठी व्हिसा हवा असतो आणि तो मिळवून देण्याशिवाय तिच्यापुढे कोणताही पर्याय नाही.
सुहानाचा सहकारी जेकब ती ज्या-ज्या वेळेस डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स घेते, त्या वेळेस जेकब तिथे उभा असतो. जेकबला तिच्यावर संशय असतो. तो तिच्यावर पाळत ठेवून असतो. तो तिच्या घरी येतो. सुहाना त्याला जाब विचारते. तेव्हा तो म्हणतो आपल्या देशाने तुला काय कमी केले की, तू ही गद्दारी करत आहेस. पण जेकबचे असं तिच्या घरी येणं सोपं नसतं. कारण सुहानाच्या घरावर पण दिवस-रात्र पाळत असते. जेव्हा पाक एजंटच्या लक्षात येतं की, ती आता अडकणार तेव्हा तिच्या घरात, तिच्या डोळ्यांदेखत जेकबला कोणीतरी गोळी झाडून ठार करतं. तिच्या लक्षात येतं की, ती पूर्णपणे त्यांच्या जाळ्यात गुरफटलेली आहे.
ऑफिसमधून जे डॉक्युमेंट लिक झालेले आहेत त्याचा शोध घेण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकारी सुहानावर टाकतात. खरं तर सुहानानेच ही गोष्ट केलेली असते. ब्लॅकमेल करणाऱयाला आपल्या देशाचा व्हिसा देण्यात ती मदत करते. त्याचा पाठलाग करते. तो एका हॉटेलमध्ये बसलेला असतो. त्याच्याकडे पाठ करून ती सेल्फी काढत जाते. त्या सेल्फीत दिसणारा चेहरा पाहून तिला धक्का बसतो कारण तो तिचा ड्रायव्हर असतो. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. आपले व्हिडीओ क्लिप घेण्यासाठी ती ड्रायव्हरच्या घरी जाते. तिथेच झालेल्या हाणामारीत सुहानाकडून ड्रायव्हर सलीम मारला जातो.
त्याच्याकडचे जुने फोटो पाहत असताना त्या फोटोमध्ये लपलेला आणखी एक चेहरा दिसतो. जो तिची चौकशी करायला आलेला असतो. कथेचा गुंता आणखीन वाढत जातो. कोण कोणाला सामील आहे हे लक्षात येत नाही. जेकबचा मित्रही सलीम ड्रायव्हरच्या घरी पोहोचतो. तो सुहानाला संतापाने ठार करणारच असतो, पण त्याआधी ती पहिल्यांदा त्याला सगळं सांगते. ते दोघे सगळे पुरावे घेऊन बाहेर पडतात.
या सगळ्या घटना घडल्यानंतर लक्षात येतं की, तिचं प्रमोशन ज्या अधिकाऱयाच्या मान्यतेने होतं, तोच अधिकारी पाकिस्तानशी मिळाला होता आणि ही सहजपणे ट्रप होईल हे त्यांना माहीत होतं. म्हणूनच तिचं प्रमोशन इतक्या लवकर झालेलं असतं. हा त्यांचा प्लॅन होता.
रॉ एजंट व सुहाना दोघे मिळून काम करतात. अधिकाऱयाचा वायफाय हॅक करून माहिती मिळवतात. त्यात त्यांना शोध लागतो की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपल्या देशात उडवण्याचा प्लॅन केला गेलेला आहे. पण का केला जाणार आहे ते लक्षात येत नाही. त्या ब्लॅकमेलरने सुहानाशी बोलताना तिला बऱयाच गोष्टी जाणीवपूर्वक सांगितलेल्या आहेत. त्याचा हेतू असा असतो की, तुझ्याकडे सगळी माहिती असेल, पण तू काहीच करू शकणार नाही. ती सगळी माहिती सुहानाला आठवते आणि ती तसतशी संदर्भ जोडत त्या रॉ एजंटला सांगते.
छोटय़ा छोटय़ा प्रत्येक घटना. त्या प्रत्येक घटनेशी जुळणारी पात्र. त्या प्रत्येक पात्रांचा इतिहास या सगळ्यांचा गुंता तसा तो लक्षात ठेवणं अवघड, पण आपण त्यात छानपैकी गुंतत जातो. चित्रपट आपल्यावर मोहिनी टाकतो. चित्रपटाची कथा तगडी आहे. माणसाला गुंतवून टाकणारी आहे आणि काही ठिकाणी जान्हवी कपूरने खूपच सुंदर अभिनय केला आहे. इंटेलिजन्स देशाच्या उपयोगी कसा पडतो किंवा राजकारणामध्ये एखादा डाव चालू असताना तो खालच्या थरापासून विदेश मंत्रालयापर्यंत कसा पोहोचलेला असतो आणि त्यात कशा रीतीने माणसं सामील असतात त्याचं जे डिटेलिंग या चित्रपटात पाहायला मिळतं ते चकित करणारे आहे. नकारात्मक दहशतवाद्याची भूमिका गुलशन देवय्याने अत्यंत प्रामाणिकपणे रंगवलेली आहे. सुधांशू सारियाचे दिग्दर्शन उत्तम आहे.