कुर्ल्याच्या नेहरू नगर पोलिसांनी एका महिलेचा जीव वाचवला. कौटुंबिक कलहातून टोकाची भूमिका घेत ती महिला आत्महत्या करणार होती. त्यासाठी तिने तयारी केली. पंख्याला फास लटकवला, पण वेळीच पोलीस तेथे धडकले आणि पुढील अनर्थ टळला.
नेहरू नगर येथील म्हाडा वसाहतीत गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. एक 35 वर्षीय महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असून तिने घरात पंख्याला फासदेखील बांधला आहे, अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. याबाबत तत्काळ नेहरू नगर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या उपनिरीक्षक पाटील, महिला अंमलदार पोळ व चालक साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. तेथे वरिष्ठ अधिकाऱयांनी त्या महिलेचे समुपदेशन केले. सहकाऱयासोबत झालेल्या पैशांच्या वादातून आत्महत्या करण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला होता, पण पोळ व त्यांच्या सहकाऱयांनी वेळीच धाव घेऊन महिलेला रोखल्याने अनर्थ टळला.