खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणावरून कॅनडा आणि हिंदुस्थानचे संबंध ताणले गेले असतानाच आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेलाही खलिस्तानी दहशतवाद्यांचा पुळका आला आहे. गुरपतवंतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयने ‘रॉ’चे माजी अधिकारी विकास यादव यांचा वाँटेड यादीमध्ये समावेश केला आहे.
गुरपतवंतसिंग पन्नू हा अमेरिकन नागरिक असून तो खलिस्तान समर्थक आहे. खलिस्तानी दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग राहिला आहे. हिंदुस्थाननेही पन्नूला दहशतवादी घोषित केले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पन्नूच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. एक हिंदुस्थानी नागरिक आणि एका हिंदुस्थानी अधिकाऱयाने हा कट रचला. मात्र कट हाणून पाडण्यात आला. या प्रकरणी निखिल गुप्ता या हिंदुस्थानी नागरिकाला जूनमध्ये अटक केली. तो सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे, असे अमेरिकेच्या ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी न्यायालयात सांगितले.
आरोपपत्रात विकास यादव यांचे नाव
या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात सीसी-1 असा उल्लेख होता. याबाबत खुलासा करताना सीसी-1 ही व्यक्ती हिंदुस्थानच्या रॉचे माजी अधिकारी विकास यादव असल्याचे म्हटले आहे. आरोप निश्चित करताना यादव यांना एफबीआय त्या वाँटेड लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. विकास यादव यांचे छायाचित्रही जारी केले आहे.
एक लाख डॉलर्सचे कंत्राट
n वकिलाने न्यायालयात सांगितले की, न्युयॉर्कच्या रस्त्यावर दोन व्यक्ती कारमध्ये डॉलर्सची देवाण-घेवाण करतानाचे छायाचित्र मिळाले आहे. पन्नूच्या हत्येसाठी विकास यादव आणि निखिल गुप्ता यांनी हिटमॅन (मारेकरी) नेमला होता. तो हिटमॅन अमेरिकन सरकारचा गुप्तहेर होता. त्याला एक लाख डॉलर्सचे कंत्राट देण्यात आले होते.
n गुरपतवंत सिंग पन्नू अमेरिकेचा नागरिक आहे. अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणे गुन्हा आहे, असे वकिलाने कोर्टात सांगितले.