शिवसेनेत जोरदार इनकमिंग! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक साळुंखे, मोरेश्वर भोंडवे शिवबंधनात

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीनिवासस्थानी आज महत्त्वाचे पक्षप्रवेश झाले.

भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख, माजी आमदार राजन तेली, भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून या सर्वांचे शिवसेनेत स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी या वेळी सर्वांना मार्गदर्शन केले. शिवसेनेची मशाल आत्तापासूनच घराघरात पोहोचवा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.

गद्दार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये जुलूमशाही आणि हुकूमशाही चालवली आहे, ती खंडित करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे या वेळी सुरेश बनकर म्हणाले.

भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धणगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेशराव कदम, नांदेड येथील भाजपचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य बाळासाहेब बोकारे, नाकेश्वरचे सरपंच रुपेश वाघ, कपिल भोजने, कमलेश कदम, तानाजी पाटील यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले. या वेळी नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे उपस्थित होते.

नितेश राणेंच्या त्रासाला कंटाळलो राजन तेली

राजन तेली या वेळी म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांत दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघात काहीही केले नाही. आरोग्य, नोकरी, काजूला हमीभाव मिळावा यासाठी केसरकर यांनी काहीच केले नाही. केवळ आश्वासने दिली, पण ती पूर्ण केली नाहीत. 2005ला मी चूक केली, ती चूक सुधारण्याची संधी उद्धव ठाकरे यांनी आज मला दिली, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. भाजपशी आपले काहीच वाईट नसून केवळ नितेश राणे यांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपमधून बाहेर पडलो, असे ते म्हणाले.

गद्दाराला त्या झाडाच्या मुळाखाली गाडायचेय संजय राऊत

महाराष्ट्रातली झाडं, डोंगर दिसली नाहीत, त्यांना त्या झाडांच्या मुळाखाली आपल्याला गाडायचे आहे आणि सांगोल्यातील गद्दाराच्या छाताडावर हातात मशाल घेऊन, पाय रोवून दीपकआबा विजयी होतील, अशा शब्दांत यावेळी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सांगोल्याचे मिंधे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर यावेळी निशाणा साधला. दीपकआबा साळुंखे यांचे राजकारण आम्ही वर्षानुवर्षे जवळून पाहतोय. त्यामुळे ते आमदार म्हणून विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे, असे संजय राऊत म्हणाले. दीपक साळुंखे यांच्यासारखा माणूस आज उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेत आला. भविष्यातही त्यांना, त्यांच्या चाहत्यांना आणि सांगोल्याला त्यांच्या या निर्णयाचा गर्व वाटेल असा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असेही ते म्हणाले. दीपक साळुंखे यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ते आमदार म्हणून विजयी होतील, असा विश्वासही  राऊत यांनी व्यक्त केला.