Ind VS Nz 1st Test – टीम इंडियाचं दमदार कमबॅक; रोहित, विराटसह सरफराजने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फोडलं

हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या बंगळुरू येथील कसोटी सामन्यात टीम इंडियाने आपला डाव सावरला आहे. तिसऱ्या दिवसा अखेर टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात तीन विकेट गमावत 231 धावा केल्या आहेत. सरफराज खानने तडाकेबंद फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले असून 70 धावा करून तो नाबाद आहे. दिवसा अखेर टीम इंडियाला तिसरा झटका विराट कोहलीच्या (70 धावा) स्वरुपात बसला.

न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या. रचीन रविंद्रने 134 धावांची शतकीय पारी खेळत संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. त्याचबरोबर अनुभवी गोलंदाज टीम साउथी याने सुद्धा 73 चेंडूंमध्ये 65 धावा करत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचे सहकार्य केले. यांच्या व्यतिरिक्त कॉनवे (91 धावा) आणि व्हिल यंग (33 धावा) यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघ सर्वबाद 402 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या. तसेच बुमराह आणि अश्विन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट आणि सिराजने 2 विकेट घेतल्या.

पहिल्या डावात घसरगुंडी झाल्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने चांगले कमबॅक केले आहे. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यशस्वी जयस्वालने महत्वपूर्ण 35 धावा आणि रोहित शर्माने 52 धावा केल्या. यानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी संघाची सुत्र आपल्या हाती घेत डाव सावरला. दोघांनीही संयमी फलंदाजी करत दिवसा अखेर टीम इंडियाला 231 धावांपर्यंत पोहचवले. विराटने 102 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या, विराटला सरफराजने चांगली साथ दिली त्याने सुद्धा 78 चेंडूंचा सामना करत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 70 कुटून काढल्या. न्यूझीलंडकडून पटेल याला 2 आणि फिलीप्सला 1 विकेट घेण्यात यश आले.