सातत्याने दारुण पराभवांना सामोरे जात असलेल्या पाकिस्तानच्या अखेर जिवात जीव आला. इंग्लंडचा पहिला डाव 291 धावांत संपवून 75 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवणाऱया पाकिस्तानने दुसऱया डावात 221 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 297 धावांचे जबरदस्त आव्हान उभारले. त्यानंतर पहिल्या डावात शतकी प्रहार करणाऱया बेन डकेट आणि झॅक क्राऊलीला बाद करत तिसऱया दिवसअखेर पाहुण्या इंग्लंडची 2 बाद 36 अवस्था केली आणि मालिकेत बरोबरी साधण्याच्या दिशेने आपली पावले टाकली. आता इंग्लंडला मालिका जिंकण्यासाठी 261 धावांची गरज आहे, तर पाकिस्तान मालिका बरोबरीपासून आठ विकेट दूर आहे.
तिसऱया दिवशी 16 विकेट
कसोटीचा तिसरा दिवस अत्यंत नाटय़मय ठरला. आज तिसऱया दिवशी इंग्लंडचे सहा तर पाकिस्तानचे दहा असे एपंदर 16 विकेट पडल्या. बुधवारी 2 बाद 211 अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडची दिवसअखेर 6 बाद 239 अशी घसरगुंडी उडाली होती. आज तिसर्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि जॅक लिचच्या 25 धावांच्या खेळीने इंग्लंडला 291 धावांपर्यंत नेले. बुधवारी 4 विकेट टिपणाऱया साजिद खानने आणखी 3 विकेट घेत डावात 111 धावांत 7 विकेट टिपण्याची सर्वोत्तम कामगिरी केली. नोमान अलीने 3 विकेट घेतल्या.
सलमान आगाने पाकला सावरले
इंग्लंडचा डाव गुंडाळल्यानंतर पाकिस्तानच्या दुसऱया डावालाही घसरण लागली. पाकिस्तानचे आघाडीवीर स्वस्तात बाद झाल्यामुळे 114 धावांतच त्यांचा अर्धा संघ गारद झाला होता. तेव्हा सातव्या क्रमांकावर आलेल्या सलमान आगाने 63 धावांची वेगवान खेळी करत पाकिस्तानच्या डावाला अनपेक्षितपणे 221 पर्यंत नेले. त्याने साजिद खानसह 65 धावांची रचलेली भागी पाकिस्तानी डावाला स्फूर्ती देणारी ठरली. नवव्या विकेटच्या या भागीने पाकिस्तानची आघाडी 300 धावांसमीप नेली. साजिद 22 धावांवर नाबाद राहिला. आगा-साजिदच्या भागीमुळे पाकिस्तानच्या जिवात जीव आला असून ते इंग्लंड हरवून आपल्या पराभवांची मालिका खंडित करण्यासाठी प्रयत्न करतील. उद्या कसोटीचा चौथा दिवस असून मुल्तानचा सुल्तान कोण असेल हे चौथ्या दिवशीच ठरणार, हेसुद्धा निश्चित आहे.