प्रसारमाध्यमांपुढे बदनामीकारक विधाने करणाऱया भाजप आमदार नितेश नारायण राणे यांना गुरुवारी अटक टाळण्यासाठी माझगाव न्यायालयापुढे शरण यायचे होते. उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट रद्द करताना त्यांना दंडाधिकाऱयांपुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नितेश राणेंवर कोर्टवारीची नामुष्की ओढवली होती, मात्र गुरुवारी महानगर दंडाधिकारी आरती कुलकर्णी अनुपस्थित होत्या. त्यामुळे सुनावणी टळली आणि नितेश राणेंना अटक टाळण्यासाठी कोर्टात हजेरी लावण्यापासून आयतीच सूट मिळाली. याप्रकरणी आता नोव्हेंबरमध्ये पुढील सुनावणी होणार आहे.