राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने जिह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱहाळी, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, आचारसंहितेचे पालन करणे राजकीय पक्षांनाही अनिवार्य आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार करत असताना, संबंधित विभागांच्या सर्वप्रकारच्या परवानगी घेऊनच प्रचार करावा. लोकसभा निवडणूक कालावधीत ज्या पद्धतीने जिह्यातील सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन केले, त्याप्रमाणेच या निवडणुकीतही करावे, असे त्यांनी आवाहन केले.

निवडणूक कार्यक्रमानुसार दि. 22 ऑक्टोबरला अधिसूचना प्रसिद्ध. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज स्वीकारणे. अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर. अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर.  मतदान 20 नोव्हेंबर, तर मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबर 2024 रोजी होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

सोलापूर जिह्यात 11 विधानसभा मतदारसंघ असून, प्रत्येक मतदारसंघात निवडणूक प्रचारासाठी विविध परवानग्या राजकीय पक्षांना घेण्यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ही ‘एक खिडकी’ योजना आहे. राजकीय पक्षांनी विहित ठिकाणी विहित मुदतीत सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच प्रचार सभा, निवडणूक मिरवणुका घ्याव्यात. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्वसामान्यांनी तक्रारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती श्रीमती कुंभार यांनी दिली.