ठसा – डॉ. वि. ना. श्रीखंडे

>> डॉ. श्री. दे. नाईक

प्रसन्न व्यक्तिमत्वाचे, नव्वदी पार केलेले मुंबईतले प्रसिद्ध शल्यविशारद डॉ. वि. ना. श्रीखंडे यांचे जाणे त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचे मन हेलावणारे असेल.

55 वर्षांच्या वैद्यकीय व्यवसायात मलाही त्यांच्या सहवासाचे, मार्गदर्शनाचे काही क्षण लाभले. त्यातून बरेच शिकायला मिळाले. मोठ्या माणसांचे बोल ही आयुष्यभराची शिदोरी असते याचा प्रत्यय आला.

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी नवखा डॉक्टर होतो तेव्हाची गोष्ट. ही डॉ. श्रीखंडे यांच्या संदर्भातली पहिली आठवण. एका डॉक्टर मित्राच्या वाढदिवसानिमित्त त्या संध्याकाळी आम्ही बाजूच्या कामतच्या हॉटेलात जाऊन छोटीशी पार्टी केली. बाहेर पडताना एरवी पान न खाणारा मी, मित्रांच्या आग्रहावरून पान खातच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आलो. त्याच वेळी डॉ. श्रीखंडे त्यांच्या टीमसह योगायोगाने तिथे आले आणि एकदम माझ्याकडे वळले. अगदी मायेने पाठीवर हात फिरवत म्हणाले, ‘‘इथेच नव्हे तर डॉक्टर म्हणून कार्यरत असताना कधीही पान खाऊ नका.’’ त्यांचा हा सल्ला मी आजतागायत पाळला आहे.

पुढे मी माथाडी रुग्णालयासाठी काम करू लागल्यावर अनेक मान्यवर डॉक्टरांशी सतत संपर्क येऊ लागला. आमचे रुग्ण मुंबईतल्या विविध रुग्णालयांत दाखल करावे लागत असत. त्यात जी. टी. हॉस्पिटलचाही समावेश होता. तिथे शल्यसेवा देणारे श्रीखंडे या कष्टकरी कामगारांशीही अत्यंत आपुलकीने वागत याचा प्रत्यय आला. आमच्या माथाडी आरोग्य केंद्राच्या वाशी येथील उद्घाटनासाठीही ते आवर्जून आले होते. अशा अनेक भेटींमधून त्यांच्याशी असलेले संबंध दृढ होत गेले.

आमच्या नात्यातील डॉ. मिलिंद कान्हेकर याचे तर ते गुरूच होते. परभणीमधल्या त्याच्या लॅप्रोस्कोपी केंद्राचे उद्घाटन करायला डॉ. श्रीखंडे यांनी तत्काळ होकार दिला. परतीच्या प्रवासात एकाच गाडीने  निघालो. गप्पा रंगल्या असतानाच संध्याकाळच्या वेळी डॉक्टरांना खिडकीतून मनोहारी सूर्यास्त दिसला. त्यांनी गाडी थांबवली आणि अनिमिष नेत्रांनी सूर्यास्ताचा सुंदर देखावा पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे सततचे ते स्मितहास्य आणि संपूर्ण जीवनातील प्रसन्नता यामागचे रहस्य त्यांच्या या रसिकतेमध्ये दडले असावे असे मला वाटले.

डॉ. श्रीखंडे यांचे शल्यकौशल्य सर्वाधिक होते ते स्वादुपिंड आणि पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेतील. यासाठी ‘लॅप्रोस्कोपिक सर्जरी’ फार महत्त्वाची असते. आमच्या माथाडी रुग्णालयातील लॅप्रोस्कोपिक ऑपरेशनसाठी आवश्यक तर अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्या टीममधील शल्यविशारद पाठवण्याची तयारीही डॉ. श्रीखंडे यांनी त्वरित दाखवली. डॉ. श्रीखंडे यांची आणखी एक हृद्य आठवण व्यक्तिगत जीवनातली. माझी आई कॅन्सरने आजारी असताना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्र्ाक्रिया करण्याची निकड निर्माण झाली. डॉ. श्रीखंडे यांनीच हे ऑपरेशन केले. मात्र कॅन्सरने शेवटची पायरी गाठली होती. आईच पेशंट असल्याने मी ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो नव्हतो. ऑपरेशन पूर्ण होताच डॉ. श्रीखंडे बाहेर येतच म्हणाले, तुम्हाला अंदाज असेलच, पण माझाही नाईलाज आहे. काळजी घ्या. बस्स! ते धीर देणारे शब्द कायम स्मरणात राहतील.कालांतराने एका मासिकासाठी मुलाखत घेताना त्यांनी असेही सुचवले होते की, ‘व्यसनाधीन रुग्ण असतील तर त्यांची तंबाखू-मद्यपान वगैरेंपासून मुक्तता करण्यासाठीही प्रबोधनाचे प्रयत्न व्हावेत आणि तरुण पिढी निरोगी रहावी म्हणून कार्य करावे.’ त्या वेळी आम्ही यासंदर्भात तयार केलेल्या पथनाटय़ाची फिल्मच त्यांना दाखवली. यावर डॉ. श्रीखंडे यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.

आमच्याकडे पहिल्या दिवशी वाशी आरोग्य केंद्राच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी कामगारांशी थेट संवादच साधला. कोणत्याही व्यसनापासून अलिप्त राहणे का महत्त्वाचे आहे हे त्यांनी हजारो कामगारांना सोप्या शब्दांत पटवून दिले. कठीण वैद्यकीय परिभाषा न वापरताही आरोग्यासंबंधीची जनजागृती कशी करता येते, हे त्यांच्या भाषणातून सर्वांनाच जाणवत होते.

डॉक्टर असो वा पेशंट किंवा कोणत्याही वयाची व्यक्ती, डॉ. श्रीखंडे तेवढय़ाच उत्साहाने आपला मुद्दा स्पष्ट करत असत हे अनेकदा दिसून आले. ‘…आणि दोन हात’ हे त्यांचे आत्मकथन वैद्यक क्षेत्रातील सर्वांना आणि सामान्य वाचकांनाही स्फूर्ती देणारे आहे. सुमारे सात दशकांच्या यशस्वी वैद्यकीय कारकीर्दीत नैतिकतेला प्राधान्य देऊनही यशस्वी कसे व्हावे याचा वस्तुपाठच त्यांनी दिला.

9 सप्टेंबरला ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा निवर्तले, तर 11 तारखेला डॉ. श्रीखंडे आपल्याला सोडून गेले. अशा महान व्यक्तिमत्त्वांचे अस्तित्व हाच समाजाचा एकेक आधारस्तंभ असतो. आज अभावानेच असलेले असे भक्कम स्तंभ कोसळताना पाहिले की, मन व्याकूळ होते. डॉ. श्रीखंडे यांना विनम्र अभिवादन!