Ind Vs Nz 1st Test – दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडचे वर्चस्व, Team India बॅकफुटवर; गोलंदाजांकडून चाहत्यांना आशा

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेती पहिला सामना बंगळुरूमध्ये सुरू झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी वाऱ्याच्या वेगाने सुसाट गोलंदाजी करत हिंदुस्थानी फलंदाजांना मैदानावर टिकू दिले नाही. दिवसाअखेर न्यूझीलंडने तीन गड्यांच्या मोबदल्यात 180 धावा केल्या आहेत.

बंगळुरुमध्ये सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची घसरगुंडी झालेली पहायला मिळाली. टीम इंडियाचा संपूर्ण संघ 46 धावांवर बाद झाला. यशस्वी जयस्वाल (13 धावा) आणि ऋषभ पंत (20 धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. तसेच विराट कोहलीसह पाच फलंदाजांना साधा भोपळा सुद्धा फोडता आला नाही. न्यूझीलंडकडून मॅट हॅन्रीने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर विल्यम ओरुरके याने 4 आणि टीम साउथीने 1 विकेट घेतली.

प्रत्त्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने चांगली सुरुवात केली. कर्णधार टॉम लॅथम (15 धावा) आणि कॉनवे (91 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागी केली. त्यानंतर आलेल्या व्हील यंगने चांगली फलंदाजी करत 5 चौकार ठोकले आणि 33 धावा करुन तो बाद झाला. रविंद्र जडेजाने त्याला बाद केले. रचिन रवींद्र (22 धावा) आणि डॅरि मिचेल (14 धावा) हे नाबाद आहेत.