गाळात रुतलेल्या अलिबागजवळच्या आक्षी साखर मच्छिमारी बंदराचा लवकरच विकास होणार आहे. मेरिटाईम बोर्डने येथील विकासासाठी दिलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 159 कोटी 91 लाख 75 हजार 692 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून बंदरातील गाळ काढण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या मच्छीमार बोटी थेट धक्क्याला लागणार असून मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाने आक्षी साखर येथे ग्रोयन्स बंधारा, जेट्टी, पोहोचरस्ता, नौकानयन भागातील गाळ काढणे आदी कामे यातून होणार आहेत. मुख्य समुद्राच्या येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे येथे निर्माण होणारा जलवेग (वॉटर करंट) थांबवण्याकरिता ब्रेकवॉटर बॉलची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे खोल समुद्रातून बंदरात येणाऱ्या बोटी विनासायास येऊन बंदरात सुरक्षित उभ्या राहू शकणार आहेत. तसेच या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याकरिता सुरक्षा भिंत (प्रोटेक्शन बंड) बांधण्यात येणार आहे. आक्षी बंदर विकासचे हे काम तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे हे बंदर एक सुसज्ज मच्छिमारी बंदर होणार आहे. या बंदरामुळे मच्छिमारी व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले जाते.
गेली अनेक वर्षे आमचे बंदर गाळाने भरले होते. बोट किनाऱ्याला लावेपर्यंत नाकी नऊ येत असते. मात्र आता जेट्टीचे काम सुरू झाल्याने आमचा महत्त्वाचा प्रश्न सुटणार आहे. हे जेट्टी बंदर पूर्ण झाल्यावर आमच्या बोटी धक्क्याला लावणे सहज शक्य होणार आहे. आमचा वेळही वाचणार आहे.
नवीन होणाऱ्या या जेट्टीमुळे वेळ व पैसा वाचणार आहे. आमच्या व्यवसायात अधिक सुबत्ता येणार आहे. तसेच बोटी लावण्यावरून होणाऱ्या शाब्दिक चकमकींना आता पूर्णविराम मिळणार आहे.