बाबा सिद्दिकी यांच्यावर तर्किश बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार, हल्ल्यानंतर शर्ट बदलायचा होता प्लॅन

माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शिवकुमार याने तर्किश बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केला होता. मंगळवारी घटनास्थळ परिसरात सापडलेल्या बॅगेत पोलिसांना शिवकुमारने वापरलेली ती उच्च दर्जाची पिस्तूल, शिवकुमारचे आधार कार्ड आणि एक शर्ट सापडले आहे. पण अद्याप पसार झालेल्या तीन आरोपींचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही.

बाबा सिद्दिकी यांच्यावर विजयादशमी दिनी शनिवारी वांद्रे पूर्वेकडील खेरनगर येथील कार्यालयाबाहेर तिघा आरोपींनी हल्ला केला होता. गोळय़ा थेट छातीत घुसल्याने बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. पण धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना पोलिसांनी लगेचच पकडले. पण गोळीबार करणारा शिवकुमार मात्र परागंदा होण्यात यशस्वी झाला. दरम्यान, पकडलेल्या आरोपींकडून दोन पिस्तुले हस्तगत करण्यात आली होती. त्यातले एक ऑस्ट्रिया बनावटीचे तर दुसरे देशी बनावटीचे पिस्तूल होते. मंगळवारी पोलिसांना घटनास्थळ परिसरात सापडलेल्या बॅगेत तर्किश बनावटीचे पिस्तूल, शिवकुमारचे आधार कार्ड, एक शर्ट आणि दुचाकी खरेदी केलेली पावती मिळाली. शिवाय पोलिसांनी आरोपीनी भाडय़ाने घेतलेल्या घराजवळ उभी करून ठेवलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

गोळय़ा झाडल्यानंतर शर्ट बदलायचा होता

गोळय़ा झाडून पोबारा करताना आरोपींनी शर्ट बदलायचे ठरवले होते. त्यानुसार धर्मराज आणि गुरमेल यांनी शर्टदेखील बदलले होते. पण शिवकुमार याने शर्ट बदलला की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु पोलिसांच्या हाती लागलेल्या बॅगेत शिवकुमारचे एक शर्ट, आधार कार्ड व त्याने वापरलेले तर्किश बनावटीचे पिस्तूल मिळाले आहे.

आमदार झिशान सिद्दिकी यांनी घेतली सहआयुक्तांची भेट

अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर गुन्हे शाखेने चार आरोपींना पकडले. अजूनही मुख्य शूटरसह काही आरोपी पसार आहेत. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचे पुत्र व आमदार झिशान सिद्दिकी यांनी आज गुन्हे शाखेच्या सहआयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गुह्याच्या तपासाचा आढावा घेतल्याचे समजते.

दुचाकीऐवजी रिक्षाने घटनास्थळ गाठले

आरोपींनी पुण्यात एक जुनी वापरती दुचाकी 32 हजारांत खरेदी केली होती. त्या दुचाकीवरून आरोपी बाबा सिद्दिकी यांचे घर आणि घटनास्थळाची रेकी करत होते. पण काही कारणास्तव आरोपी घटनेच्या दिवशी दुचाकीऐवजी रिक्षाने खेरनगर येथे गेले होते. प्रत्यक्ष गोळीबार करण्याच्या पाऊण तास आधी आरोपी तेथे पोहचले होते. मग योग्य संधी साधत बाबा सिद्दिकी कार्यालयातून बाहेर येताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता, असे तपासात समोर आले आहे.

सर्व बाजूने तपास सुरू

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.  विविध कारणं बोलली जात आहेत. त्यामुळे आम्ही प्रत्येक बाजूने तपास करीत असून प्रत्येक बाबी पडताळून पाहत आहोत. शिवकुमार, शुभम व काही आरोपी हाती लागल्यानंतर हत्येमागच्या कारणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येते.