पॉइंट रीडिमच्या नावाखाली लावला चुना

पॉइंट रीडिमच्या नावाखाली ठगाने अकाऊंटंटला चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

घाटकोपर येथे राहणारे तक्रारदार हे नवी मुंबईच्या एका कंपनीत अकाऊंटन्ट म्हणून काम करतात. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून फोन आला होता. फोन करणाऱ्याने तो बँकेतून बोलत असल्याचे भासवले. व्हॉटस्अॅपवर पाठवलेली फाईल उघडण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी फाईल उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती फाईल उघडली गेली नाही. त्यानंतर ती फाईल अचानक डिलीट झाली. त्याच दिवशी तक्रारदार हे एका एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. ते पैसे काढण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पैसे निघत नव्हते. त्यानंतर ते दुसऱ्या बँकेच्या एटीएममध्ये गेले. तेथेदेखील पैसे काढले जात नव्हते.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांना व्हॉट्सअॅपवर पुन्हा एक फाईल आली. ती फाईल त्यांनी उघडली नाही. काही वेळाने त्यांना एका नंबरवरून पह्न आला. पॉइंट रीडिमसाठी फाईल पाठवली आहे, ती उघडण्यास सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी फाईल उघडण्यास नकार दिला. या घटनेनंतर त्यांना एका नंबरवरून पह्न आला. त्यांनी तो पह्न उचलला नाही. ठगाने त्यांना ईमेल आयडी व्हॉटस्अॅपला अपडेट करण्यास सांगितले. त्यांनी ईमेल आयडी अपडेट केला नाही. काही वेळाने त्यांना ओटीपी येण्यास सुरुवात झाली.  त्यांच्या खात्यातून पैसे गेल्याचा त्यांना मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.