न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, हातात तलवारी ऐवजी संविधान

सर्वोच्च न्यायालयात ‘लेडी ऑफ जस्टिस’ अर्थात न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसविण्यात आली आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आहे. तसेच एका हातात तराजू कायम आहे. मात्र, दुसऱया हातात असणारी तलवार हटवून त्या जागी देशाचे संविधान असणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या लायब्ररीमध्ये ही न्यायदेवतेची नवीन मूर्ती ठेवण्यात आली आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही नवीन मूर्ती तयार करून घेतल्याचे सांगितले जाते. जुनी मूर्ती म्हणजे डोळ्यावर पट्टी, एका हातात तराजू आणि दुसऱया हातात तलवार हे चित्र उभे राहते. कायद्यासमोर सर्व समान असे या मूर्तीचे प्रतीक होते. जगभरातील अनेक देशांमध्ये न्यायदेवतेची अशी मूर्ती आहे. मात्र, डोळ्यावरील पट्टीमुळे कायदा अंधळा आहे, असेही म्हटले जात होते. परंतु न्यायदेवतेच्या नवीन मुर्तीच्या डोळ्यावर पट्टी नाही. कायदा डोळस आहे, आंधळा नाही, असे यातून सूचित करायचे आहे.

काय आहे इतिहास?

न्यायदेवतेला ‘लेडी ऑफ जस्टिस’ म्हटले जाते. डोळ्यावर पट्टी, हातात तराजू आणि तलवार अशी मूर्ती. यामागे रंजक इतिहास आहे. या न्यायदेवतेची संकल्पना इजिप्शियन, ग्रीक आणि रोमन साम्राज्यांमध्ये दिसून येते. ‘लेडी ऑफ जस्टिस’चा उल्लेख इजिप्शियन देवी माट, ग्रीक देवी थेमिस आणि डाइक पिंवा डाइसच्या रूपात होत असतो. देवी माट हे समतोल, सुसंवाद, न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिक मानले जाते. ग्रीकमध्ये थेमिस हे सत्य, कायदा आणि सुव्यवस्थेची प्रतीक आहे. रोमन पौराणिक कथांमध्ये जस्टिसियाला न्यायाची देवी मानले गेले. देवीच्या हातात तराजू आणि तलवारीसोबत डोळ्यांवर पट्टी न्याय व्यवस्थेच्या नैतिकतेचे प्रतीक मानले गेले. ज्याप्रकारे देव कुठलाही भेदभाव न करता समान न्याय देतो, त्याप्रमाणे न्यायदेवताही न्याय देते अशी यामागची भावना आहे.