गतवर्षीची पुनरावृत्ती की वचपा? अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलिया आफ्रिकेशी भिडणार

जगज्जेती ऑस्ट्रेलियन टीम सलग आठव्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज झालीय. यंदा स्पर्धेच्या साखळीत विजयी चौकार ठोकणारा ऑस्ट्रेलियन महिला संघ गतवर्षीच्या वर्ल्ड कपची पुनरावृत्ती करताना दक्षिण आफ्रिकेच्या गळय़ात पराभवाची माळ टाकण्यासाठी उत्सुक असली तरी दक्षिण आफ्रिका ते अपयश धुऊन पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

मंगळवारी वेस्ट इंडीजने गटात अव्वल असलेल्या इंग्लिश संघाला केवळ हरवलेच नाही तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्याचीही किमया केली. या पराभवाने इंग्लंडच्या खेळाडू अक्षरशः ढसाढसा रडल्या. हा पराभव त्यांच्या अक्षरशः जिव्हारी लागला. विंडीजच्या या अफलातून कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिका ‘ब’ गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारी दुसरी टीम ठरली. त्यामुळे आफ्रिकन संघाला आपण आपल्या खेळाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलोय, हे दाखवून देण्याची संधी आहे.

गतवर्षी आफ्रिकन संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती, पण त्यांचा संघ 19 धावांनी हरला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱयांदा जगज्जेतेपदाची हॅटट्रिक केली होती. हे त्यांचे सहावे विक्रमी जेतेपद होते. 2009 साली झालेल्या पहिल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत हरला होता. त्यानंतर सलग सातही स्पर्धा ते अंतिम फेरी खेळले आहेत. 2010, 2012 आणि 2014 साली जगज्जेतेपदाची हॅटट्रिक केल्यानंतर 2016 साली वेस्ट इंडीजने त्यांच्या जगज्जेतेपदाची परंपरा खंडित केली होती. या अपयशानंतर 2018, 2020 आणि 2023 या सलग तिन्ही स्पर्धा ऑस्ट्रेलियन महिला संघाने जिंकल्या. आता ही विजयी मालिका खंडित करण्याचे ध्येय आफ्रिकन संघासमोर असले तरी अपराजित ऑस्ट्रेलियन संघाला हरवणे सोपे काम राहिलेले नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या महिलांनीही या स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना तीन विजय मिळवले आहेत. मात्र त्यांना पराभूत करणारा इंग्लिश संघ मंगळवारी साखळीतच गारद झाला आहे. दक्षिण आफ्रिकन संघ ऑस्ट्रेलियाच्या तोडीचा नसला तरी त्यांची कर्णधार लॉरा वॉलवार्ड्ट आणि तझमिन ब्रिट्स यांचा जबरदस्त फॉर्म काहीही करू शकतो. त्यामुळे एलिसा हिलीचा संघ कोणताही धोका न पत्करता आपला अपराजित खेळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करील.

उपांत्य फेरीत भिडणारा संघ

ऑस्ट्रेलिया – एलिसा हिली (कर्णधार-यष्टिरक्षक), डर्सी ब्राऊन, अशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, एलाना किंग, फिबी लिचफिल्ड, ताहिला मॅकग्रा, सोफी मोलिनिक्स, एलिस पेरी, मेगान शट, ऍनाबेल सदरलॅण्ड, जॉर्जिया वेअरहॅम, हिथर ग्रॅहम

दक्षिण आफ्रिका – लॉरा वॉलवार्ड्ट (कर्णधार), अनेक बोश, तझमिन ब्रिट्स, नादाइन डी क्लार्क, अनेरी डर्कसन, मिक डी रायडर, अयांडा लुबी, सिनालो जाफ्ता, मेरीझेन काप, अयाबोंगा खाका, सुन लूस, नोनकुलुलेको मलाबा, सेशनी नायडू, टुमी सेखुखुने, क्लो ट्रायन.