जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सांगली शहरासह वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसाचे पाणी शेतात साचून सऱया भरून वाहत आहेत. पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. द्राक्ष छाटणी सुरू असल्याने पावसामुळे द्राक्ष बागायतदारांनाही दणका बसला आहे. दरम्यान, कोयना धरणातून दुपारी 1050 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मागील दोन दिवसांपासून जिह्याच्या विविध भागात पाऊस होत आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्यातील अनेक गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. जून महिन्यापासून सातत्याने पाऊस होत असल्याने शेतात पाणी कायम आहे. खरिपातील सोयाबीन आणि भुईमुगाची काढणी सुरू असून, संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. द्राक्ष हंगाम सुरू होणार असताना छाटण्या सुरू आहेत. पाऊस सुरूच असल्याने द्राक्षबागांना फटका बसणार असल्याचे चित्र आहे.