आणखी एका विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी, बंगळुरुला जाणारे विमान दिल्लीत उतरवले

गेल्या दोन दिवसांत विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी येत आहे. त्यानंतर आजही दिल्लीहून बंगळुरुला जाणाऱ्या अकासा एअरलाइन्सच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली. त्यानंतर तत्काळ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

अकासा विमानाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अकासा विमान QP 1335 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून-बंगळुरूला जात होते. यावेळी विमानात 174 प्रवासी होते. 3 लहान बालकं आणि 7 क्रू सदस्य होते. त्यांना सुरक्षा अलर्ट मिळालाय. अकासा विमानाची इमरजन्सी रिस्पॉन्स टीमने परिस्थिती पाहता पायलटला दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वळविण्यास सांगितले.

ही घटना त्यावेळी समोर आली जेव्हा मंगळवारी 7 विमानांना सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती. यामध्ये एक विमान अमेरिकेला जाणार होते, त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी वेगवेगळ्या विमानतळांवर दहशतवाद विरोधी ड्रिल सुरू केली होती. सोमवारीही मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली होती. ज्यामुळे शेकडो प्रवाशांना आणि एअरलाइन्सच्या क्रू सदस्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर या सर्व धमक्या अफवा असल्याचे समजले. आतापर्यंत अकासा विमानाच्या या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप असून तपास सुरू आहे.