बदलत्या विचारसरणीनुसार लग्न आणि त्यासाठी जोडीदार निवडण्याच्या प्रक्रियेत झपाट्याने बदल होत आहेत. आताची पिढी लग्नाला जास्त महत्त्व देत नसून लीव्ह इन रिलेशन पद्धतीकडे त्यांचा कल आहे. तर काही देशांमध्ये ‘प्लेजर मॅरेज’ला जास्त प्राधान्य दिले जाते.
लॉस एन्जेलिस टाईम्सने दिलेल्या अहवालानुसार, इंडोनेशियामध्ये ‘प्लेजर मॅरेज’चे (पैशाच्या मोबदल्यात मुली काही काळासाठी एखाद्या पुरुषाची पत्नी म्हणून राहतात) प्रमाण वाढत चालले आहे. इंडोनेशिया हे पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. येथे येणारे पर्यटक तात्पुरत्या पत्नीच्या शोधात असतात. त्यामुळे इंडोनेशियातील गरीब समुदायातील महिला ‘एका विशिष्ट काळासाठी वधू’ बनण्यासाठी त्या पर्यटकांकडून मोठी किंमत घेतात. त्यामुळे अलीकडच्या काळात लीव्ह इन रिलेशननंतर ‘प्लेजर मॅरेज’चे प्रमाण वाढत चालले आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
इंडोनेशियातील या लग्न पद्धतीला काही लोकांचे समर्थन आहे. कारण आर्थिक अडचणींमध्ये गरीब महिलांना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे साधन म्हणून ही लग्नपद्धती विकसित झाली आहे, असे समर्थकांचे म्हणणे आहे. ही प्रथा विशेषत: लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या पुनकक भागात प्रचलित आहे. तसेच इंडोनेशियातील या लग्न पद्धतीवर अनेक लोक टीका करत आहेत. बाहेरच्या देशातून येणाऱ्या पर्यटकांमुळे इंडोनेशियाची संस्कृती बिघडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.