भाजप ‘मदारी’, मिंधे-अजितदादांचा खेळ या निवडणुकीतच संपवणार! संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख झाली असून 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या, पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या सोयीच्या तारखा असून अत्यंत घाईघाईत निवडणुका घेतल्या जात आहेत. 23 नोव्हेंबरला मतमोजणी, तर 26 तारखेपर्यंत विधानसभेची मुदत आहे. हरयाणा, जम्मू-काश्मीरबरोबर निवडणुका घेता आल्या असत्या, पण तरीही 26 तारखेला नवीन सरकार स्थापन होईल आणि ते महाविकास आघाडीचे असेल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी निवडणुकीनंतर मिंधे-अजितदादांचे काय होणार याचे भाकीतही वर्तवले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देताना आमच्या माणसांनी त्याग केल्याची आठवण करुन दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, शहा किंवा भाजपने कोणताही त्याग केलेला नाही. शहांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता, शिवसेना तोडायची होती, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करायचा होता त्यासाठी त्यांनी मिंधे आणि त्यांच्या लोकांचा वापर करून घेतला. भाजप किंवा त्यांच्या नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द अजिबात शोभत नाही. त्या शब्दाचा अपमान आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे प्रादेशिक अस्मितेचे पक्ष तोडणे आणि त्यासाठी शहांनी आपल्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितले. याला त्याग नाही स्वार्थ म्हणतात. त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या लुटीला त्याग म्हणणार का? असा सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मदारी असून ही सगळी माकडे आहेत. मिंधे, अजित पवार यांचा खेळ भाजप या निवडणुकीतच संपवेल. भाजप या माकडांवर आपल्या तालावर नाचवणार आणि सोडून देणार. यावेळी राऊत यांनी निवडणुकीआधी मिंधे सरकारने घोषणांचा कोरडा पाऊस केल्याचे म्हटले. टोलमाफीचा निर्णय सगळ्यात मोठा घोटाळा आहे. मुदतीआधी टोलमाफी केल्यामुळे करार झालेल्या कंपन्यांना शेकडो कोटींचा परतावा द्यावा लागणार आहे. त्यातले 50 टक्के निवडणुकीत वापरण्यासाठी मिंधे, भाजप आणि अजित पवार यांच्या वाट्याला जाणार असून हे पडद्यामागे ठरलेले सूत्र आहे. राज्याच्या तिजोरीतून हे पैसे त्या टोल कंपन्यांना द्यावे लागणार, असा आरोपही राऊत यांनी केला.

‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार करणाऱ्यांना हिंदुत्व व राष्ट्रभक्तीवर पिपाण्या वाजवायचा अधिकार नाही!

निवडणुकीसाठी पुरेसा वेळ मिळाला का असे विचारले असता राऊत म्हणाले की, आमच्या उमेदवारांना हा वेळ पुरेसा आहे. आम्हाला काही पैशांचे वाटप करायचे नाही. आमचा प्रचार झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवण्याचे ठरवले आहे, असेही राऊत म्हणाले.