>> प्रभाकर पवार
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे माजी राज्यमंत्री झियाउद्दीन अब्दुल रहीम सिद्दिकी ऊर्फ बाबा सिद्दिकी यांची (वय वर्षे – 66) वांद्रे पूर्व निर्मलनगर (खेरनगर) येथील राम मारुती रोडवर शनिवार, दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकी यांचे आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दिकी यांना अगदी जवळून महागड्या परदेशी बनावटीच्या (ऑस्ट्रिया) ग्लॉक या पिस्तुलातून 3 गोळ्या झाडण्यात आल्या. 1 गोळी आरपार छातीत घुसल्याने बाबा सिद्दिकी यांचा रात्री 11.30 वाजता रुग्णालयात मृत्यू झाला.
बाबा सिद्दिकी व त्यांचा आमदार मुलगा यांना गोळ्या घालून ठार मारण्यासाठी अर्धा डझन आरोपींनी झिशान यांच्या बांद्रे येथील कार्यालयाबाहेर अनेक दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. अखेर त्यांना शनिवारी विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांना मारण्यात यश आले. परंतु दोन आरोपी पळत असताना निर्मलनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र दाभाडे व त्यांचे सहकारी सागर कोयंडे, अमोल पवार व सुरेखा माने यांनी गुरमेल बलजितसिंग (23, हरयाणा) व धर्मराज राधे कश्यप (19, उत्तर प्रदेश) या दोघा भाडोत्री गुंडांना जागेवरच पकडले. या दोघांना पकडल्यानंतर बाबा सिद्दिकीना गोळी घालणारा शिवकुमार गौतम (24), मोहम्मद जिशान अख्तर, प्रवीण लोणकर, शुभम लोणकर या पंजाबच्या लॉरेन्स बिष्णोई टोळीतील आरोपींची नावे पुढे आली. पुण्याचा प्रवीण लोणकर यास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतीच अटक केली असून त्यानेच बाबा सिद्दिकीच्या हत्येच्या कटकारस्थानात सामील असलेल्या आरोपींना आश्रय दिला होता. त्यांना पैशाचे वाटप केले होते. प्रवीण लोणकर व त्याचा भाऊ शुभमने पुण्याच्या भालेकर वस्तीमध्ये भाड्याचा गाळा घेतला होता. त्यात त्याने कुणाला संशय येऊ नये म्हणून दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली होती. परंतु त्या गाळ्यात बसून तो गुन्हेगारी कारवाया करीत होता बिष्णोई टोळीतील शूटरची तो खाण्यापिण्याची. राहण्याची सोय करायचा. यापूर्वीही पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिधू मुसेवाला हत्येप्रकरणी बिष्णोई टोळीसाठी काम करणाऱ्या पुण्यातील संतोष सुनील जाधव, नवनाथ सुरेश सूर्यवंशी व सौरभ ऊर्फ सिद्धेश, महाकाल हिरामण कांबळे या शूटरना पंजाब पोलिसांनी अटक केली होती.
लॉरेन्स बिष्णोई हा पंजाबमधील एका पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. सध्या तो गुजरातच्या साबरमती जेलमध्ये आहे. तेथूनच तो अंडरवर्ल्डची सूत्रे हलवितो. साबरमती जेलच्या आजूबाजूला बिष्णोईच्या हस्तकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या टोळीचे बरेच शूटर गुन्हा केल्यानंतर गुजरातला पळतात. तेथे आश्रय घेतात असे पोलीस तपासात उघड झालेले आहे. बाबा सिद्दिकी यांची हत्या एसआरए प्रकल्पाच्या वादातून बिष्णोईला सुपारी देऊन घडवून आणण्यात आली आहे, असे सांगण्यात येते. परंतु सुपारी देणारे आरोपी कधी सापडत नाहीत. गोळ्या घालणारे, आश्रय देणारे, पैशांचे, शस्त्रांचे वाटप करणारेच आरोपी पोलिसांच्या हाती लागतात. त्यामुळे हत्येमागचा खरा हेतू (Motive) शेवटपर्यंत कळत नाही. मुंबईत एक डझन नगरसेवक, अर्धा डझन आजी-माजी आमदारांसह एक हजारच्या वर व्यावसायिकांना, हॉटेलचालकांना व प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना गेल्या 30 वर्षात शूट आऊटमध्ये मारले गेले आहे. परंतु महत्त्वाच्या व्यक्तींच्या हत्येमागचे बरेच खरे सूत्रधार सापडलेले नाहीत. महत्त्वाच्या राजकीय व्यक्तीचे नाव कळल्यावर तपास पुढे जातच नाही. बाबा सिद्दिकी खून प्रकरणातही तेच होणार आहे.
बाबा सिद्दिकी यांना मारण्यासाठी लष्करी व पोलीस अधिकारी वापरतात अशा अत्याधुनिक (Sophisticated) पिस्तुलांचा वापर केला गेला. म्हणजे एक गोळी झाडल्यावर समोरच्या व्यक्तीने ‘हे राम’ म्हटलेच पाहिजे. पोलीस संरक्षण जरी असले तरी आपले जे लक्ष्य, टार्गेट असते त्याला जागेवरच खल्लास करायचा लॉरेन्स बिष्णोईचा आदेश असतो. पंजाबी गायक सिधू मुसेवाला यास लॉरेन्स बिष्णोई याने पंजाब पोलिसांच्या समोरच, त्यांच्या संरक्षणात गोळ्या घालून ठार मारले.
लॉरेन्स बिष्णोईची कार्यपद्धती (मोड्स ऑपरेंडी) ही दाऊदसारखी आहे. एकेकाळी दाऊद हा पोलिसांना जुमानत नव्हता. आपला सख्खा मेहुणा इब्राहिम इस्माईल पारकरची हत्या करणाऱ्या अरुण गवळी टोळीतील शैलेश हळदणकर व बिपीन शेरेची हत्या करण्यासाठी दाऊदने आपली आघाडीची बटालियन 12 सप्टेंबर 1992 रोजी जे. जे. रुग्णालयात रात्रीच्या वेळी घुसविली होती. त्या वेळी त्याने सरकारी लाल दिव्याच्या गाडीचा वापर केला होता. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शैलेश हळदणकर व बिपीन शेरेला मारण्यासाठी दाऊद टोळीतील सुभाष सिंग ठाकूर, सुनील सावंत, ब्रिजेशसिंग आदींनी फिल्डिंग लावली होती. या गुंडांनी एके 47 रायफलने प्रथम शैलेश व बिपीनच्या संरक्षणासाठी असलेल्या दोन पोलिसांना गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर शैलेशला मारले. बिपीन हा गंभीर जखमी झाला. परंतु काही दिवसांनी त्याचेही निधन झाले. दाऊदच्या या खतरनाक कार्यपद्धतीमुळे त्या वेळी सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. सुधाकरराव नाईक यांना जे. जे. शूट आऊट व त्यानंतर झालेल्या जातीय दंगलीमुळे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
भाजपचे नेते व माजी आमदार रामदास नायक यांनाही त्यांच्या घराजवळ रस्त्यावर गाडीतच गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. प्रथम नायक यांच्या कारच्या पुढे बसलेल्या भिकाजी तडवी या कार्बाइनधारी कमांडोला दाऊद टोळीतील फिरोज कोकणीने एके 47 रायफलमधून 25 ऑगस्ट 1994 रोजी सकाळी 9 च्या सुमारास वांद्रे, पाली हिल येथे गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर गाडीत असलेल्या रामदास नायक यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. आता बाबा सिद्दिकी या माजी मंत्र्याला पोलीस संरक्षणात ठार मारण्यात आले आहे.
बिष्णोईने महाराष्ट्रातील मुंबई व पुणे पूर्णपणे पोखरले आहे. सलमान खानवरील हल्ल्याच्या प्रयत्नानंतर बिष्णोई टोळी सुसाट सुटली आहे. तरीही आपल्या नावाजलेल्या, जगभरात लौकिक असलेल्या मुंबई डिटेक्शन क्राईम ब्रँचकडून हवी तशी प्रतिबंधात्मक कारवाई केली जात नाही. खबऱ्यांचे नेटवर्क नाही. समाजातील जाणकार व्यक्तीशी संपर्क नाही. कर्तबगार, चाणाक्ष, मेहनती अधिकारी शोधावे लागतात. त्यामुळेच बिष्णोई गैंग मुंबईत फोफावली आहे. दाऊदला पोलिसांनी मोठा केला. मग बिष्णोईला कोण मोठा करीत आहे? त्याला जर वेळीच रोखले नाही, तर भविष्यात लोकप्रतिनिधींना, महत्त्वाच्या व्यक्तींना, उद्योगपतींना उघडपणे फिरणे मुश्कील होईल. हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.