लोकसभा निवडणुकीच्या निकालाची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती होऊन महायुती सरकार सत्तेतून पायउतार होण्याच्या भीतीने मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) तसेच मंत्री आस्थापनेवरील अधिकाऱ्यांनी आपली वर्णी मंत्रालयात महत्त्वाच्या विभागात लावून घेतली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यामुळे या अधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीआधीच सत्ताबदलाची चाहूल लागल्याची चर्चा मंत्रालयात सध्या आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत राहून गृह विभाग सांभाळणारे व्यंकटेश भट यांनी आपली बदली उद्योग, ऊर्जा विभागात करून घेतली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयातील आणखी एक सहसचिव कैलास बिलोणीकर यांची बदली जलसंपदा विभागात झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे खासगी सचिव मंगेश शिंदे यांनी सहसचिव आपली वर्णी शालेय शिक्षण, क्रीडा विभागात लावून घेतली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव सचिन सहस्रबुद्धे, चंद्रशेखर तरंगे, मनोजकुमार महाले यांची बदली अनुक्रमे ग्रामविकास, गृहनिर्माण, महसूल आणि वन विभागात झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री कार्यालयात प्रतिनियुक्तीवर रुजू झालेले अवर सचिव सुधीर शास्त्री यांची सेवा नगरविकास विभागात, धीरज अभंग यांची गृहनिर्माण विभागात, नीलेश पोतदार यांची पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागात, प्रवीण पाटील यांची महसूल आणि वन विभाग तर वृषाली नवाथे यांची वित्त विभागात प्रत्यावर्तीत करण्यात आली आहे.
निवडणुकीपूर्वीच अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री, मंत्री कार्यालयातील आपले बस्तान हलविले आहे. राज्यात निवडणूक होऊन नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वीच या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात महत्त्वाच्या जागी आपला मुक्काम हलविला आहे.