महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषणा केली आहे. वायनाड मतदारसंघातून काँग्रेसने प्रियांका गांधी यांना पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजयी झाले आहेत. राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवली आणि वायनाडचा राजीनामा दिला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. वायनाडमधून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे प्रियांका गांधी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
नांदेडमध्येही पोटनिवडणूक
काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेबरोबरच 20 नोव्हेंबरला नांदेड लोकसभेसाठी मतदान होईल आणि 23 तारखेला निकाल लागेल.