पदार्पणातच गुलामची राजेशाही शतकी खेळी, पाकिस्तानची 5 बाद 259 अशी मजल

गेल्याच आठवडय़ात मुल्तानच्याच स्टेडियमवर इंग्लंडने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. परिणामतः पाकिस्तानच्या नव्या निवड समितीने दुसऱ्या कसोटीतून दिग्गज खेळाडूंना वगळण्याचे धाडस दाखवले आणि नव्या खेळाडूंना संधी दिली. निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवताना कसोटी पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामने आपल्या पहिल्याच डावात राजेशाही थाटात फलंदाजी करत 118 धावांची स्फूर्तिदायक खेळी केली तर नव्या दमाच्या सईम अयुबसह 149 धावांची भागी रचत पाकिस्तानला पहिल्या दिवसअखेर 5 बाद 259 अशी धावसंख्या उभारून दिली.

पाकिस्तानी निवड समितीने पहिल्या कसोटीतील अपयशानंतर संघातून बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संघातून वगळले आणि युवा खेळाडूंना आजमावले. पाकिस्तानच्या बदललेल्या संघाची टॉस जिंकून फलंदाजीला उतरल्यावर सुरुवात अत्यंत वाईट झाली. जॅक लिचच्या फिरकीने आपल्या सलग षटकांत अब्दुल्ला शफिक (7) आणि शान मसूद (3) यांची विकेट घेत पाकिस्तानची 2 बाद 19 अशी अवस्था केली. तेव्हा फलंदाजीला आलेल्या पदार्पणवीर कामरान गुलामने नवोदित सईम अयुबच्या साथीने पाकिस्तानी डावाला सावरण्याची कमाल दाखवली. या दोन्ही युवा फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत किल्ला लढवला. विशेष म्हणजे बाबरला वगळून या कामरान गुलामला संघात पदार्पणाची संधी देण्यात आली आणि त्याने बाबरचे सिंहासन हादरवणारी खेळी करत अवघ्या पाकिस्तानचे लक्ष आपल्याकडे वेधले. त्याने तिसऱ्या विकेटसाठी 149 धावांची खेळी भागी रचली. त्याच्यासोबत अयुबने 77 धावांची दमदार खेळी केली. मॅथ्यू पॉट्सने ही भागी पह्डण्यात यश मिळवले. त्यानंतर फलंदाजीला आलेला सऊद शकील लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर मोहम्मद रिझवानसह गुलामची गट्टी जमली. गुलामने 192 चेंडूंच्या संयमी खेळीनंतर आपले पदार्पणीय शतक साजरे केले. पदार्पणातच शतक ठोकणारा गुलाम हा तेरावा पाकिस्तानी फलंदाज ठरला. गुलाम-रिझवानची जोडीच अभेद्य राहणार असे वाटत असताना गुलामची 118 धावांवर शोएब बशीरने यष्टी उडवली. त्यानंतर उर्वरित खेळ रिझवान आणि सलमान आगाने खेळून काढला.