भाजपला विधानसभा निवडणुकीच्या तारखा आधीच माहिती! JMM चा मोठा आरोप

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांची आज घोषणा केली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पक्षाने झारखंड मुक्ती मोर्चाने (JMM) थेट निवडणूक आयोगावरच निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तारखांची माहिती भाजप नेत्यांना कालच मिळाल्याचा आरोप JMM चे नेते मनोज पांडे यांनी केला आहे.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मनोज पांडे यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखांवरून भाजपवर निशाणा साधला आहे. आम्ही निवडणुकांसाठी नेहमीच तयार आहोत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज निवडणुक आयोग तारखा जाहीर करणार आहे. मात्र याबाबतची माहिती कालच भाजपच्या नेत्यांना माहिती मिळाली आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. निवडणूक आयोग भाजप नेत्यांच्या सूचनेवर काम करतो का? असा थेट सवाल यावेळी मनोज पांडे यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला अशा प्रकारे सरकारचं बाहुलं बनवून ठेवणं ही गंभीर बाब आहे, असा हल्लाबोल मनोज पांडे यांनी केला.

झारखंडमध्ये राज्यातील सर्व 81 जागांवर विधानसभा निवडणूक होणार आहेत. दरम्यान झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. राज्यात गेल्या विधानसभा निवडणूक डिसेंबर 2019 मध्ये झाल्या होत्या.