टोलमाफीचा निर्णय दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीच्या फायद्यासाठी! 800 कोटी देणार? RTI कार्यकर्त्याचा दावा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील पाच प्रवेश नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र हा निर्णय टोलमाफीचा निर्णय दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.

मुंबईच्या सीमेवर आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मुलुंड टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका या पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. या नाक्यांवरून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांना गेल्या 14 वर्षांपासून टोल आकारला जात होता. आता अवजड वाहने वगळता इतर वाहनांना टोल भरावा लागणार नाही. याच संदर्भात सामाजिक आणि माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मिंधे सरकारवर गंभीर केला आहे.

मंगळवारी सकाळी विजय कुंभार यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत म्हटले की, कंत्राट संपायला अवघे काही महिने असताना मुंबईत फक्त हलक्या वाहनांसाठी टोल माफीचा निर्णय घेतला गेला आहे. बदल्यात ज्या कंपनीला 800 कोटी रूपये दिले जाणार आहेत ती कंपनी दिवाळखोरीत गेली आहे. दिवाळखोरीत गेलेल्या कंपनीला 800 कोटी रूपये? सरकारला दिवाळखोर ठेकेदाराचे नुकसान भरून काढायचे आहे का? असा सवाल कुंभार यांनी केला आहे.

दरम्यान,म हाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) टोल वसूल करण्यासाठी मुंबईच्या या पाच प्रवेश नाक्यांचे कंत्राट अवघे 2242.35 कोटी रुपये एकरकमी घेऊन एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 2010-11 मध्ये दिले होते. तत्पूर्वी एमएसआरडीसीकडून या नाक्यांवर टोलवसुली केली जात होती. एमएसआरडीसीने 1999-2000 ते 2009-2010 या कालावधीत एकूण 926.92 कोटी रुपये कर वसूल केला होता. मुंबईतील 31 उड्डाणपुलांच्या देखभाल दुरुस्तीकरिता झालेला खर्च वसूल करण्यासाठी मुंबईतील पाच प्रवेश नाक्यांवर टोल सुरू करण्यात आला. कंत्राटदार कंपनीकडून एमएसआरडीसीने घेतलेली रक्कम आणि गेल्या 14 वर्षांत टोल वसुलीतून कंपनीला मिळालेले पैसे यामध्ये मोठी तफावत असून कंपनीला या टोल वसुलीतून मोठा फायदाच झाल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)